आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागणपतीची कल्पक संकल्पचित्रे काढून आगळ्यावेगळ्या बाप्पाच्या मूर्ती निर्माण करण्यात हातखंडा असलेले मुंबईतील भायखळ्याचे चित्रकार प्रकाश लहाने यांनी ‘बाप्पाचा फॅशन डिझायनर’ म्हणून करिअरचे अनोखे दालन खुले केले आहे. यंदा कोरोना संकटाच्या काळातही लहाने यांनी ४० मंडळांच्या बाप्पांची फॅशन केली.
अनेक वर्षे आपण बाप्पाची अखंड मूर्ती पाहत आलो आहोत. बाप्पाचे दागिने, वस्त्रे मूर्तीचा अविभाज्य भाग असतात. कालांतराने बाप्पांचे दागिने खरे आले. प्रकाश लहाने यांनी बाप्पांची वस्त्रे खरीखुरी आणली आहेत. प्रकाश लहाने यांना गणेशोत्सवाच्या जवळपास ३०० ते ३२५ बाप्पांना सोवळे नेसवण्याचे काम असते. हे काम सलग ११ दिवस असते. वस्त्रधारी बाप्पाची कल्पनेविषयी ते म्हणाले, १४ वर्षांपूर्वी मूर्तिकार मित्र राजू शिंदे यांच्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष रणजित माथूर यांना संकल्प चित्रे दाखवायला गेलो असता त्यांनी मला त्यांच्या मोठ्या गणपतीला धोतर नेसवणार का? अशी विचारणा केली.
लहानपणी १२ वी खेतवाडीच्या गणेशोत्सवात कंसाच्या वधाचा देखावा हाेता. ते आठवले आणि मी होकार दिला. मग मला वाटले आपण बाप्पाला खऱ्या कपड्यात आणले तर... तेथून या आगळ्यावेगळ्या कलेला प्रारंभ झाला. ही कला मंडळांना भावली. मग दरवर्षी त्यांना साेवळे नेसवण्याचे मला आमंत्रण मिळू लागले. बाप्पाला सोवळे (धाेतर) नेसवण्याच्या कलेबाबत सांगताना लहाने म्हणाले की, मूर्तीला साजेल साेवळे परिधान करणे ही कला आहे. प्रत्येक गणपतीची बैठक वेगळी असते. त्यामुळे मूर्तीला सोवळे परिधान करण्याआधी मी स्वत:वर सराव करतो. त्यात ब्राह्मणी सोवळे, पेशवा सोवळे, योद्धा सोवळे, सिंगल कोच सोवळे अशा वेगवेगळ्या सोवळ्यांच्या पद्धतींचा समावेश असतो. त्यामुळे प्रयोगात कायम नावीन्य राहते. सोवळ्याच्या निऱ्या नीट पडाव्या लागतात. त्या आकर्षक दिसण्यासाठी जपान सॅटीन, गोल्डन पेपर, सिल्कसारख्या कपड्याचा मी वापर करतो. सोवळे परिधान करताना आधी कमरेला नाडी बांधून त्याच्याभोवती फिरवले जाते. खांद्यावरच्या उपरण्यासाठी पदरावर नक्षीकाम केलेल्या साड्यांचा उपयोग करतो.
एका बाप्पाची फॅशन साथीदाराच्या मदतीने अर्ध्या तासात पूर्ण हाेते. गणेशाेत्सवात लहाने यांचा दिवस पहाटे तीनला सुरू हाेतो. अंघोळ करून प्रथम चिंचपाेकळीच्या चिंतामणीपासून सोवळे नेसवण्यास प्रारंभ करतात. मग लालबागच्या तेजुकाय गणपती, खेतवाडीचा गणपती या मानाच्या आठएक गणपतींना साेवळे नेसवण्यात येते. सलग ११ दिवस लहाने यांचा हा दिनक्रम असतो.
वस्त्रांचा होताे लिलाव
गणेशोत्सवातील ११ दिवसांत बाप्पांना जी साेवळी आणि उपरणे घातली जातात त्यांचा गणेशाेत्सवानंतर लिलाव केला जाताे. बऱ्याचदा गणेशाेत्सव मंडळाकडून गणेशभक्तांना बाप्पाचा प्रसाद म्हणून ही वस्त्रे दिली जातात. दरम्यान, लहाने यांच्याकडे आता पुढील वर्षांची आगाऊ बुकिंग देखील असते, असेही त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.
तब्बल ६५ मीटरचे धोतर
७ फुटांपासून ते १६ फूट उंचीच्या गणपतींना साेवळे नेसवले जाते. गणेशाेत्सव मंडळे ११ दिवसांची ऑर्डर देतात. ती महिनाभरआधी दिली जाते. साेवळ्याचे सेट तयार केले जातात. १६ फुटांच्या गणपतीसाठी ६५ मीटर कपडा लागताे. बाप्पाच्या उंचीनुसार मानधन आकारले जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.