आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांत नियमावली:गणेशोत्सवाला कोरोना नियमांची आडकाठी; सणांपेक्षा घरातील माणूस महत्त्वाचा : मुख्यमंत्री

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री गर्दी टाळण्याचे आवाहन करीत असताना सोमवारी दादरच्या बाजारात उसळलेली गर्दी. - Divya Marathi
मुख्यमंत्री गर्दी टाळण्याचे आवाहन करीत असताना सोमवारी दादरच्या बाजारात उसळलेली गर्दी.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गणेशोत्सव काळातली गर्दी नियंत्रित राहावी व संभाव्य तिसरी लाट थोपवली जावी यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. कोरोना कृती दलाशी दोन दिवसांत चर्चा करून ही नियमावली स्पष्ट केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्य आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक घेतली. त्यामध्ये गणेशाेत्सव काळातील गर्दी नियंत्रणावर चर्चा झाली. सण-उत्सव नंतरही साजरे करून सणांपेक्षा लोकांचे प्राण महत्त्वाचे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाची सोमवारी बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सा.बां.मंत्री अशोक चव्हाण, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार उपस्थित हाेते.

नागपुरात तीन दिवसांनंतर पुन्हा लेव्हल थ्रीचे निर्बंध; दोन्ही डोस घेतल्यानंतरही १२ जणांना काेरोना संसर्ग
नागपूर | लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही १२ मोठे आणि एक लहान मुलगा अशा १३ जणांना पुन्हा काेरोना झाल्यामुळे प्रशासन हादरले आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत उद्योजक, व्यापारी यांच्यासह सर्व समाज घटकांशी चर्चा करून नागपुरात परत लेव्हल थ्रीचे निर्बंध लागू करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर बोलताना दिली. नागपूर जिल्ह्यात एकूण ४ लाख ९३ हजार ७२ रुग्णांची नोंद झाली आहे.

परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देणे ही राजकीय पक्षांची जबाबदारी
- प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाही तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पाहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्रीगणेशाची इच्छा असेल, असे मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले.

- कोविड परत वाढतो आहे. येणारे दिवस आव्हानात्मक आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर राजकीय पक्षांवर त्याची जबाबदारी आहे.

बातम्या आणखी आहेत...