आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO मै हूं डॉन!:गँगस्टर अरुण गवळीचा तुफान डान्स व्हायरल, मुलाच्या हळदी समारंभात धरला ठेका

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुख्यात डॉन अरुण गवळीचा एक डान्स करतानाचा व्डिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. मुलगा योगेश गवळीच्या लग्नासाठी अरुण गवळी सध्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे.

मुलाच्या लग्नाच्या हळदी समारंभात पत्नीसोबत अरुण गवळीने 'मै हूं डॉन' या गाण्यावर ठेका धरला. आपल्या पत्नीसोबत गवळीचा डान्स करतानाचा हा व्हिडिओ आता समोर आला आहे. सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

4 दिवसांचा पॅरोल

कुख्यात डॉन अरुण गवळी एका खून प्रकरणामध्ये नागपुरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळीला चार दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. त्यामुळे गवळी चार दिवस तुरुंगाबाहेर राहणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी अरुण गवळीच्या मुलाचे लग्न झाले. त्यापूर्वी हळदी समारंभातील अरुण गवळीचा एका गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात आपल्या पत्नीसोबत गवळी मनसोक्त नाचताना दिसत आहे.

1 लाखांच्या जातमुचलक्यावर रजा

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच पत्नीच्या आजारपणामुळे गवळीला संचित रजा मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला चार दिवसांची रजा देण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडूच् ही रजा मंजूर करण्यात आली आहे. गवळीला पोलिसांच्या सुरक्षेसह मुंबईला आणण्यात आले. यासोबतच या प्रवासाचा सर्व खर्च हा अरुण गवळीलाच करावा लागणार आहे. मुलाच्या लग्नासाठी अरुण गवळीने विना सुरक्षा आठ दिवसांची रजा मंजूर केली जावी अशी विनंती केली होती. मात्र, कोर्टाने त्याला 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर चार दिवसांची रजा मंजूर केली आहे.

मुलीच्या लग्नासाठीही बाहेर आला होता

अरुण गवळी याला यापूर्वीही देखील अनेकदा रजा मिळाली आहे. 2020 मध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेले असताना देखील तो मुलीच्या लग्नासाठी तुरुंगाबाहेर आला होता. तेव्हा त्याला पॅरोल मिळाला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्षय वाघमारेसोबत अरुण गवळीची लेक योगिता गवळीचा विवाह झाला होता.

गवळीवर कोणता गुन्हा आहे?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणामध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2007 मध्ये मुंबईमधील असल्फा परिसरामध्ये कमलाकर जामसंडेकर यांच्यावर घरात शिरुन गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 2008 मध्ये अरुण गवळीला बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर 2012 मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून अरुण गवळी हा तुरुंगात आहे.

बातम्या आणखी आहेत...