आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांना गणराया देश हिताची सदबुद्धी देवो:काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी भाजपवर डागली तोफ; द्वेषाला छेद देण्यासाठी पदयात्रा - थोरात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या देशातील परिस्थिती चिंतेची असून विविधेत एकता असलेल्या देशात आज द्वेषाचे, विषमतेचे बिज पेरले जात आहे. देशाची अखंडता धोक्यात आली आहे. महागाई, बेरोजगारीसारखे प्रश्न बिकट झाले आहेत, परंतु केंद्रातील मोदी सरकार या ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून इतर मुद्दे पुढे केले जात आहेत. देशाची अखंडता अबाधित रहावी यासाठी काँग्रेस पक्ष राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली 7 सप्टेंबरपासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेचे आयोजन केले असल्याची माहिती मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री जितू पटवारी यांनी दिली.

पटवारींकडून पदयात्रेची माहिती

गांधी भवन येथे भारत जोडो पदयात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आजोन केले होते. यावेळी बोलताना जितू पटवारी पुढे म्हणाले की, ही पदयात्रा 12 राज्ये व 2 केंद्र शासित प्रदेशातून 150 दिवसात 3500 किलोमीटरची असेल. यात्रेदरम्यान राहुलजी गांधी विविध समाज घटकांशी संवादही साधणार आहेत. देशातील ज्वलंत प्रश्नांचा उहापोहही केला जाणार आहे. 10 टक्के लोकांकडे 50 टक्के संपत्ती व 50 टक्के लोकांकडे 10 टक्के संपत्ती अशी विषमता देशात वाढीस लागली आहे. 27 कोटी लोक पुन्हा दारिद्र्यरेषेच्या खाली गेले. 80 कोटी लोकांना केंद्र सरकार मोफत राशन देत आहे, ही भयानक परिस्थिती झाली आहे. देशातील आर्थिक विषमता, सामाजिक विभाजन, अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा, राजकीय केंद्रीकरण या मुद्द्यांवर या यात्रेदरम्यान प्रकाश टाकला जाणार आहे. देश सर्व जाती धर्माचा असून सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे काम मागील काही वर्षात केले जात आहे. देशाची ही एकता पुन्हा कायम ठेवण्यासाठी भारत जोडो यात्रा महत्वाची आहे.

सरकारविरोधात येण्याची वेळ - थोरात

​​​​​यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी महात्मा गांधी यांनी 1942 साली चले जावचा नारा दिला आणि अख्खा देश एकटला होता आता पुन्हा एकदा जुलमी सरकारच्या विरोधात एक होण्याची वेळ आली आहे. माणसा माणसांमध्ये भेद करण्याचे, विषमतेचे, द्वेषाचे राजकारण मागील काही वर्षांपासून वाढीस लागले असून याला छेद देऊन एकोपा निर्माण करण्याची गरज आहे.

लोकशाही, संविधान धोक्यात आले आहे, अशावेळी देशाच्या एकतेसाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची असून त्यासाठीच भारत जोडो यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ही यात्रा देगुलर येथे 7 नोव्हेंबरला प्रवेश करेल व नांदेड मार्गे पुढे 16 दिवसात 383 किमीचे अंतर राज्यातून पार करेल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आणखी दोन दिवस महाराष्ट्रात या यात्रेचा कार्यक्रम वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पटोलेंचे भाजपवर टीकास्त्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, भाजपाच्या राज्यात देशातील सामाजिक, राजकीय वातावरण बिघडले आहे. देशाच्या सीमा सुरक्षीत नाहीत. भारताच्या सीमेत चीनने घुसखोरी केली आहे. जम्मू काश्मिरच्या निवडणुका अजून घेतल्या जात नाहीत, काश्मिरी पंडितांच्या हत्या वाढल्या आहेत. देशातील जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे.

देशाची सुरक्षितता व देशातील ज्वलंत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर आले आहेत. गणराया अमित शहा यांना देश विकण्याची नाही तर देशहिताचे काम करण्याची सदबुद्धी देवो हीच आमची गणरायाकडे प्रार्थना आहे असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.

या पत्रकार परिषदेला मध्य प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितू पटवारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...