आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुकुमाचा एक्का:तीन वोट हमें दे दो ठाकुर.. प्रमुख राजकीय पक्षनेत्यांच्या 20 दिवसांपासून विरारवाऱ्या!

अशोक अडसूळ | मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकीत छोटे पक्ष व अपक्षांना कमालीचे महत्त्व आले असून पालघर जिल्ह्यातील विरार येथील बहुजन विकास आघाडीचे (बविआ) अध्यक्ष व आमदार हितेंद्र ठाकूर बड्या पक्षांसाठी हुकमाचा एक्का ठरले आहेत. परिणामी गेल्या २० दिवसांपासून सर्वपक्षीय नेते मतांसाठी विरार वारी करत आहेत.

आमदार हितेंद्र ठाकूर या मराठी माणसाची वसई-विरार-पालघर परिसरात बहुजन विकास आघाडी पाय रोवून घट्ट उभी आहे. बोईसर, वसई आणि नालासोपारा या तीन विधानसभा मतदारसंघात बविआचे आमदार आहेत. १० जून रोजी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीतील धक्कादायक निकालामुळे बविआ चर्चेत आली. बविआच्या तीन मतांसाठी ठाकुरांच्या विरारमधील कार्यालयाचा उंबरठा सर्वपक्षीय नेत्यांना झिजवावा लागत आहे.

साेमवारी विधान परिषदेसाठी मतदान हाेत आहे. बविआची तीन मते ज्याच्या पारड्यात पडतील त्याचा विजयी निश्चित आहे. राज्यसभा निवडणुकीतही बविआची तीन मते निर्णायक ठरली. विश्वासदर्शक ठरावावेळी महाविकास आघाडीला बविआने पाठिंबा दिला होता, मात्र शिवसेना व बविआ यांचा पालघर जिल्ह्यात थेट राजकीय संघर्ष उद्भवल्याने हितेंद्र ठाकूर सेना नेतृत्वावर नाराज आहेत.

ईडीचे छापे, तरी ठाकूर सर्वांना पुरून उरले
२४ तास उपलब्ध असलेला नेता अशी हितेंद्र ठाकुरांची ओळख आहे. ठाकुरांना लगाम घालण्यासाठी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. इतकेच नाही तर २०१९ च्या विधानसभेला ठाकुरांच्या विरोधात चकमक फेम अधिकारी प्रदीप शर्मा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. मध्यंतरी ठाकुरांशी संबंधित विवा ग्रुपच्या कंपन्यांवर ईडीचे छापे पडले. या सर्वांना हितेंद्र ठाकूर पुरून उरले.

एकनाथ शिंदेंच्या वर्चस्वाला ठाकुरांचा सुरुंग
वसई, विरार, पालघर पट्टा ठाणे जिल्ह्यात होता. त्यामुळे शिवसेनेचे बाहुबली नेते एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात एकमुखी नेतृत्वाचा प्रयत्न केला. मात्र ठाकूर यांनी शिंदे यांचे प्रयत्न मोडून काढले. ठाणे जिल्हा सहकारी बँक, वसई-विरार महापालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदेवर बविआचे आज वर्चस्व आहे. ठाकुरांच्या विवा कॉलेजने परिसरातील युवकांना शिक्षणाची गंगा आणली आहे.

म्हणूनच बविआला मिळतेय एवढे महत्त्व..
तिसऱ्या आघाडीचे महत्त्व संपून जमाना झाला, मात्र राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बविआने तिसऱ्या आघाडीची आठवण दिली. सर्व बड्या पक्षांना चारी मुंड्या चीत करत सबंध जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण केल्याने आज हितेंद्र ठाकुरांची बविआ चर्चेचा विषय ठरली आहे. राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत एक-एक मत निर्णयाक ठरले. परिणामी अपक्षांच्या मतांचा मोठा भाव निघाला. त्यावर आमदार हितेंद्र ठाकूर ऊर्फ अप्पा यांना विचारल्यावर ते नम्रपणे सांगतात, ‘मला विकत घेणारा अजून जन्माचाय’. ठाकूर यांच्या याच तत्त्वज्ञानाने आज बविआचा बोलबाला झाला.

बातम्या आणखी आहेत...