आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पडळकरांच्या जीवाला धोका:'गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका असून त्यांना विशेष सुरक्षा द्या', देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात नेहमी आंदोलन करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून, त्यांना विशेष सुरक्षा द्या. अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील पाठवले आहे.

त्यात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आंदोलन करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका आहे. बहुजनांच्या बाजूने उभे राहिल्याने यातून दुखावलेले लोक त्यांच्यावर सातत्याने हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

विरोधक असो वा सत्ताधारी ज्याचा जिवास धोका त्याला संरक्षण दिल पाहिजे आणि म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना तात्काळ विशेष सुरक्षा द्यावी, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे. त्यांच्या जीवास काही बर वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जबाबदारी असेल. पडळकरांना तात्काळ सुरक्षा द्या, असे या पत्रात म्हटले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देखील पत्राद्वारे ही मागणीस करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने पडळकरांच्या गाडीवर हल्ला केला होता. तर सांगलीमध्ये देखील पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करत प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पडळकर हे एसटी कामगारांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही. असा इशारा देखील पडळकरांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...