आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे येत्या रविवार (दि.१४) रोजी होणारी नियोजित महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय गुरुवारी दुपारी जाहीर होताच राज्यात विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. पुणे, औरंगाबादसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेले हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करताच राज्यभरात त्याचे लोण पसरले आणि पाहता-पाहता औरंगाबाद, नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, सांगली येथेही हजारो विद्यार्थी शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये जमले. अमरावती येथे विद्यार्थ्यांची आणि पोलिसांची झटापट झाली. राज्यभरात विद्यार्थ्यांच्या उद्रेकामुळे शासकीय यंत्रणेची धावपळ झाली. या वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि मंत्र्यांमध्ये एकमेकांवर खापर फोडण्याची अहमहमिकाच सुरू झाली. अखेर रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवडाभरात परीक्षा घेण्यात येईल आणि त्यासाठी शुक्रवारी तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पुण्यात आमदार पडळकरांसह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर विद्यार्थ्यांनाही समजावून परत पाठवले. दरम्यान, पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा पुढील आठवड्यात रविवार,२१ मार्च रोजी होण्याची शक्यता आहे.
मंत्री, नेते सटपटले : विद्यार्थ्यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे लक्षात येताच आघाडी सरकारमधील मंत्री, सत्ताधारी पक्षाचे नेते कमालीचे सटपटले आणि त्यानंतर शासकीय यंत्रणेवर खापर फोडण्याचे सत्र सुरू झाले. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयास विरोध दर्शवला. मग परीक्षा रद्द केली कुणी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वडेट्टीवारांचे घूमजाव : राज्य सरकारने एमपीएससी परीक्षेबाबत आज घेतलेल्या निर्णयाला पुन्हा वेगाने वाढत असलेले कोरोना संकट कारणीभूत आहे, असे वडेट्टीवार सुरुवातीला म्हणाले. मात्र विद्यार्थ्यांचा रुद्रावतार पाहिल्यानंतर त्यांनी हात झटकले व “कोरोनामुळे रुग्णालयात असून सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काहीही माहिती नाही,’ असा खुलासा केला.
पुणे पदवीधरांचे आमदार गायब? : दिवसभर पुण्यात पदवीधर विद्यार्थ्यांचे आंदाेलन सुरू हाेते. मात्र या आंदाेलनादरम्यान पुण्याचे पदवीधर आमदार अरुण लाड कुठेही दिसले नाही. याबाबत त्यांची कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्यांना बाेलण्यासाठी फाेन केला असता फाेनही लागला नाही.
एमपीएससीचे परिपत्रक आणि खुलासा
राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनच वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. प्रस्तुत परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव यांनी परिपत्रकात म्हटले आहे.
सरकारच्या निर्णयानुसार परीक्षा पुढे ढकलल्या : आयोगाचा निर्णय एकटा सचिव किंवा सहसचिव घेत नाहीत. शासनाने आम्हाला बुधवारी एक लेखी पत्र पाठवले. त्यावर राज्य लोकसेवा आयोगाने शासनाने पाठवलेल्या लेखी पत्राची अंमलबजावणी करत हे परिपत्रक काढले. हा निर्णय आपत्ती निवारण विभागाने दिला असून याला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर हा निर्णय लेखी पत्राद्वारे घेण्यात आला असल्याचा दावा आयोगाने केला आहे.
सरकारने फेरविचार करावा
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांत ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शहरात राहून या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली आहे. तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रशासनानेदेखील परीक्षा घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यामुळे सरकारने निर्णयाचा फेरविचार करून दिलासा द्यावा. - सतीश चव्हाण, आमदार
विद्यार्थ्यांचा अंत पाहू नये
ग्रामीण भागातील विद्यार्थी महानगरात एमपीएससीच्या तयारीसाठी येतात. महिन्याला किमान ८ ते १० हजार रुपये त्यांना राहण्यासाठी, खाण्यासाठी खर्च येताे. मागील दाेन वर्षांपासून परीक्षा न झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे माेठे नुकसान हाेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अंत न पाहता परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात. - महादेव जानकर, अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष.
...तर विद्यार्थ्यांचा उद्रेक अन् आंदोलन टळले असते - डाॅ. अडसूळ
एमपीएससी परीक्षा ही आता एखाद्या नाेकरीसारखी असून ती संधी प्रत्येकाला मिळणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. परीक्षा देऊन चांगले करिअर घडवण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता आहे. त्यामुळे परीक्षा वेळेत न झाल्यास उद्रेक हाेताे. परीक्षा पुढे ढकलण्याबाबत वेळीच खुलासा झाला असता तर विद्यार्थ्यांचे राज्यभरात इतके माेठ्या प्रमाणात आंदाेलन टाळता आले असते, असे मत राज्य लोकसेवा आयोगाचे माजी सदस्य तथा पुणे विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू डाॅ.अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले आहे.
औरंगाबाद : परीक्षा पुढे ढकलल्याचे कळताच औरंगाबादेतील औरंगपुरा भागात हजारो विद्यार्थी जमा झाले. या वेळी तरुणीने पायताण काढून आपला निषेध नोंदवला. तर अमरावतीमध्ये संतप्त विद्यार्थी-पोलिसांची झटापट झाली. या वेळी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. तिसरे छायाचित्र पुणे येथील नवी पेठेतील आंदोलनाचे. “आमच्या आयुष्यातील सुवर्णवर्ष वाया घालवणारे तुम्ही कोण?’ असा फलक घेऊन िनषेध करणारी तरुणी.
आमदार मेटे यांच्याकडून स्वागत
राज्यभरात विरोध होत असताना भाजपसोबत असणारे शिवसंग्राम पक्षाचे आमदार विनायक मेटे यांनी परीक्षा पुढे ढकलल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. १५ ते २५ मार्चदरम्यान “मराठा आरक्षणाची” अंतिम सुनावणी होणार आहे. त्यानंतर व कोरोना आटोक्यात आल्यानंतर या परीक्षा घेतल्या तर त्याचा फायदा “मराठा” विद्यार्थ्यांना निश्चितपणे होणार आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
आंदाेलनाचा पडळकरांनी उचलला फायदा
विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाचा राजकीय फायदा गाेपीचंद पडळकरांनी याेग्य प्रकारे करून घेतला. त्यांच्याच नेतृत्वाखाली पुण्यात रास्ता राेकाे करण्यात आला. भाजपच्या विद्यार्थी संघटनांचाही या आंदाेलनात सक्रिय सहभाग हाेता. पडळकर यांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा आराेपही काही संघटनांनी त्यांच्यावर केला आहे. रास्ता राेकाे करताना काेविडच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही.
एमपीएससी परीक्षा येत्या आठ दिवसांत हाेणार, तारीख आज जाहीर करणार : मुख्यमंत्री
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून १४ तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख शुक्रवारीच घोषित केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्याचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात मुख्य सचिव तसेच आयोगाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ काही दिवसांसाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. विद्यार्थी परीक्षा देत असलेली परीक्षा केंद्र, परीक्षा घेणारा कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे का ? प्रश्नपत्रिका वाटणारे, पर्यवेक्षक, वा परीक्षा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झाली आहे का ? त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे का, त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का या सर्व गोष्टी आरोग्य हिताच्या दृष्टीने लक्षात घ्याव्या लागतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.