आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:मराठी चित्रपट, नाटकाच्या समस्या सोडवण्यास सरकार सकारात्मक, आदेश बांदेकरांची माहिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रनगरीतील सेट्सना भाडे सवलत देण्याचाही विचार
  • नाट्य, चित्रपटगृहांना इतक्यात परवानगी मिळणे अशक्य

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीला कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे प्रचंड फटका बसला आहे. बॅकस्टेज तंत्रज्ञांचे प्रचंड हाल झाले असून गेल्या दोन महिन्यांपासून सर्वजण घरी आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतरही दोन्ही क्षेत्रे लगेचच पूर्वीप्रमाणे सुरू होण्याची शक्यता कमी असल्याने राज्य सरकारने या क्षेत्राकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आम्ही केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मकता दाखवत लवकरच योजना जाहीर केली जाणार असून गोरेगाव येथील चित्रनगरीत सध्या ज्यांचे सेट्स उभे आहेत त्यांना भाडे सवलत देण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आदेश बांदेकर यांनी बोलताना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मराठी चित्रपट आणि नाट्य जगतातील दिग्गजांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला. विविध विभागांतील जवळ-जवळ ४५ जणांशी त्यांनी दीड तास संवाद साधला. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी केले होते. या कॉन्फरन्सिंगबाबत अधिक माहिती देताना आदेश बांदेकर यांनी सांगितले, या कॉन्फरन्सिंगमध्ये बॅक स्टेज आर्टिस्ट, शास्त्रीय गायक, संगीतकार, चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते असे सर्व विभागातील कलाकार तंत्रज्ञ सहभागी झाले होते. सगळ्यांच्या वेगळ्या समस्या असल्याने त्यांना त्या मांडता याव्यात म्हणून आम्ही सगळ्यांचा समावेश केला होता. सगळ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

बॅक स्टेज कलाकार, तंत्रज्ञांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांनी कर्ज काढलेले आहे. त्यांना कशी मदत करता येईल, चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली असून नाटकांचे प्रयोग पुन्हा कसे सुरु करता येतील यावरही चर्चा झाली. मात्र नाट्य आणि चित्रपटगृहांना इतक्यात परवानगी मिळणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. निर्मात्यांना विना तारण व कमी व्याजाचे कर्ज, गरीब संगीतकारांना मदत, मराठी चित्रपटांना अनुदान रक्कम देणे, चित्रपट निर्मिती जीएसटी माफ करणे, सांगली-कोल्हापुरात चित्रीकरणाला परवानगी देणे अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. चित्रीकरणासह अन्य बाबी सुरळीत सुरू करण्यासाठी एक आराखडा तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून त्यांना लवकरच आराखडा सादर केला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूचना लिहून घेतल्या आणि सकारात्मकता दाखवत लवकरच याबाबत योजना जाहीर करू, असे आश्वासन दिल्याची माहितीही आदेश बांदेकर यांनी दिली.

मर्यादित स्वरूपात चित्रीकरणास परवानगी देण्याचा विचार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरू करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करू. ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना कसे चित्रीकरण सुरू करता येईल याचा विचार करता येईल. पण कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण करता येणार नाही. तसेच चित्रीकरणावेळी लोकांची संख्या, त्यांचे खाणे-राहणे याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. संपादन प्रक्रिया करणाऱ्या स्टुडिओमध्ये परवानगी द्यायची असेल तर तेथील जागा, वातानुकूल यंत्रणा याबाबतही सूचना द्याव्या लागतील.

बातम्या आणखी आहेत...