आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:आघाडी सेफ मोडवर; विधानसभा अध्यक्षांच्या निवडीच्या नियमात सरकार करणार बदल

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संख्याबळ घटू नये यासाठी सत्ताधाऱ्यांची खबरदारी

विधानसभा अध्यक्षपदाच्या लांबलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या वतीने विधानसभा नियमांमध्ये बदल करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे अध्यक्ष निवड ही गुप्त मतदानाऐवजी आवाजी (हात वरती करत, उघड पद्धतीने) पद्धतीने करण्याचा सरकारचा मार्ग सुकर होणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी काँग्रेस सातत्याने करत आहे. मात्र ही निवडणूक घेताना काही आमदार फुटण्याची भीती सत्ताधाऱ्यांना आहे. त्यामुळेच निवडणूक घेण्याच्या आधीच नियमात बदल करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीचा आहे. गुप्त मतदान करण्याऐवजी आवाजी पद्धतीने मतदान करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीने तयार करून तो सभागृहात पाठवण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. हा प्रस्ताव संमत करायचा असेल तर सभागृहातही बहुमताची गरज आहे. महाविकास आघाडीकडे २८८ पैकी १७० इतके संख्याबळ आहे. तर भाजपचे विधानसभेत १०६ सदस्य आहेत. ‘भारतीय घटनेनुसार ही निवडणूक गोपनीय झाली पाहिजे. नाहीतर आम्ही या निवडणुकीला विरोध करू,’ असा इशारा महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांनी दिला आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपकडून दगाफटका होऊ शकतो, अशी भीती आघाडीला आहे. हीच भीती नाना पटोले अध्यक्ष झाले तेव्हाही होती. त्यामुळे थेट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर आवाजी पद्धतीने निवडणूक पार पडली होती.

नियम बदलांबाबत सत्ताधारी, विरोधकांचे दावे-प्रतिदावे
1.
विधानसभा नियमांत बदल करण्याची बैठक उपाध्यक्षाच्या अध्यक्षतेखाली घेणे बेकायदा ठरते, असा दावा विधानसभेचे विरोधी पक्षनेते व भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

2. पक्षांतर बंदी कायद्याने त्या त्या सभागृहांनी आपल्या नियमांत बदल केले. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभेने तो केला नव्हता. तो आता होत आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

3. शिवसेना ५६, राष्ट्रवादी, ५४ , काँग्रेस ४४ व घटक पक्ष व अपक्ष १६ असे १७० संख्याबळ (२८८ पैकी बहुमतासाठी १४५ गरज) आहे. गुप्त मतदान पद्धतीत १७० चा आकडा कायम राहणार नाही असे आघाडीला वाटते.

4. बहुमत सिद्ध करताना असलेले १७० चे आघाडीचे संख्याबळ जर विधानसभा अध्यक्ष निवडीत घटले तर सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक लावून धरू शकतात.