आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप दिलासा नाहीच:पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली मदत, अतिवृष्टीग्रस्तांची दिवाळी कोरडी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपोत्सव 4 दिवसांवर, शासनाला निवडणूक आयोगाकडून अद्याप संमती नाही

राज्यात अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई दिवाळीच्या पूर्वी देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द दिला असला तरी पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेच्या तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीचा मुहूर्त हुकणार आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई दिवाळीनंतर मिळण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर-आॅक्टोबर काळात राज्यात मोठी अतिवृष्टी झाली होती. त्याच्या भरपाईसाठी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने १० हजार कोटींचा निधी जाहीर केला आहे. ही मदत दिवाळीपूर्वी अपाद्ग्रस्तांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल, असे वचन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागच्या आठवड्यात दिले होते.

मात्र राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आचारसंहिता काळात मदत देण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता लागणार आहे. येत्या शुक्रवारी, १३ नोव्हेंबर रोजी दिवाळीस प्रारंभ होत आहे. राज्य सरकारच्या हाती केवळ ४ दिवसांचा वेळ आहे. शनिवारपर्यंत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला मदत वाटपासाठी संमती दिलेली नव्हती. राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच ती मिळेल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे अजून सुरूच आहेत, असे मदत व पुनर्वसन विभागतील सूत्रांनी सांगितले. त्यामुळेही मदत देण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

३४ लाख शेतकरी प्रतीक्षेत : राज्यात १ काेटी ३७ लाख एकूण वहीत खातेदार शेतकरी आहेत. यापैकी सुमारे ३४ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानभरपाई जमा होणार आहे. हे सर्व शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, आयोगाची संमती मिळाल्यानंतर मदत पोहोचवणे हे काही ४ दिवसांत शक्य नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी जाण्याची दाट शक्यता आहे.

शेतीसाठी प्रतिहेक्टर १० हजारांची थेट मदत

जिरायती आणि बागायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १० हजार (२ हेक्टर कमाल मर्यादा) तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार (२ हेक्टर कमाल मर्यादा) नुकसानभरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी ४ हजार ५०० कोटी लागणार आहेत.

४१ लाख हेक्टर शेतपिकांचे नुकसान; उस्मानाबाद आणि सोलापूरला सर्वाधिक फटका

राज्यात पेरणीखालील क्षेत्र १७३ लाख हेक्टर असून पैकी ४१ लाख हेक्टर (२४ टक्के) शेतपिकाचे अतिवृष्टीत नुकसान झालेले आहे. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यांना बसला आहे.