आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेत बंडखोरीचे वादळ निर्माण झाल्याने महाराष्ट्रात राजकीय भुंकप झाला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. बंडखोर गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिंदे समर्थक आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
एकनाथ शिंदे हे सर्व आमदारांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने महाविकास आघाडी सरकारला रणनिती आखण्यासाठी काही दिवस मिळतील असे चित्र आहे. यातच गोव्याच्या राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांना महाराष्ट्राचा प्रभारी कारभार सोपवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, राज्यभवनाकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा कार्यभार गोव्याच्या राज्यापालांना सोपवलेला नसून भगतसिंह कोश्यारी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपलब्ध असतील, असे सांगण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा
सुरतमध्ये असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेनेच्या 35 आमदारांना गुवाहटी (आसाम) येथे नेण्यात आले आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी अटच मुख्यमंत्री ठाकरे यांना शिष्टाई करण्यासाठी सुरतला गेलेल्या मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत घातली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा हादरा बसला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या धक्कातंत्रामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेची आणि महाविकास आघाडीचीही तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी एक वाजता होणाऱ्या या बैठकीत काय निर्णय होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोश्यारी रुग्णालयात दाखल
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यपाल कोश्यारींना ताप येत होता. यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचे आज अहवाल आले असून त्यांना करोना झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे आज सकाळीच राज्यपाल कोश्यारींना रिलायन्स रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.