आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंच्या पत्रानंतर कोश्यारींचा निर्णय:गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली विधान परिषदेची यादी सात दिवसात रद्द

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडीच्यावतीने मंत्रिमंडळात शिफारस केलेल्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रद्द केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकीसाठी सुचवलेल्या बारा नावांच्या यादीचा प्रस्ताव मागे घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवले होते. एकनाथ शिंदे यांच्या पत्रानंतर कोश्यारींनी हा निर्णय घेतला.

राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेत नोव्हेंबर 2020 मध्ये 20 प्रतिष्ठित व्यक्तींची यादी विधान परिषदेवर नियुक्तीसाठी कोश्यारींना सादर केली होती. यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी प्रत्येकी चार या प्रमाणे बारा सदस्यांची यादी राज्यपालांना दिली होती. ही यादी आघाडी सरकार सत्तेच्या खूर्चीवरून खाली येईपर्यंत राज्यपालांनी मंजूर केली नाही. यावरुन राजकारण चांगलेच रंगले होते.

पाहिल्या यादीतील नावे
महाविकास आघाडीने राज्यपालनियुक्त आमदारांमध्ये ज्यांची नावे दिली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांच्या नावाचा समावेश होता. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांचा समावेश होता. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांचा समावेश होता. यात मात्र एकनाथ खडसे आणि रजनी पाटील हे दोघेजण नशिबवान ठरले आहेत. एकनाथ खडसेंची विधानपरिषदेवर वर्णी लागली आहे. तर 2021 मध्ये राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसकडून रजनी पाटील विजयी झाल्या.

भाजपला 8, शिंदे गटाला 4 जागा

आता राज्यात नव्याने आलेले शिंदे-फडणवीस सरकार राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी या 12 जागा भाजप-शिंदे यांच्याकडून भरल्या जातील, अशी शक्यता आहे. आता या नव्या यादीत आपल्या नावांचा समावेश व्हावा यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू होणार आहे.

विद्यमान सरकारमध्ये भाजपचे संख्याबळ पाहता 12 नियुक्त आमदारांपैकी 8 जागा भाजपला, तर 4 जागांवर शिंदे गटातील सदस्यांची वर्णी लागू शकते. त्यामुळे विधान परिषदेत भाजपचेही बळ वाढणार आहे.

बातम्या आणखी आहेत...