आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास पैसाच शिल्लक राहणार नाहीत, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. राज्यपालांच्या या वक्तव्यावर राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईसह महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले राज्यपाल?
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, "कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.”
राज्यपालांची केंद्राकडे करणार तक्रार - केसरकर
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शुक्रवारी (२९ जुलै) मुंबईतील दाऊद बाग जंक्शन चौकाचा नामकरण व उद्घाटन सोहळ्यात बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही वाद सुरू झाला आहे. विरोधकांसह शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांविरोधात केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यपालांचे वक्तव्य म्हणजे राज्याचा अपमान असल्याचेही ते म्हणाले.
केसरकर म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारींच्या बाजूने अशी विधाने येणार नाहीत, असे निर्देश केंद्राने द्यावे. मुंबईच्या निर्मितीत प्रत्येक समाजाचा वाटा आहे. यात मराठी माणसांचाही मोठा वाटा आहे. मुंबईच्या औद्योगिक विकासात पारशी समाजाचे मोठे योगदान आहे. राज्यपालांना मुंबईबाबत फारच कमी माहिती असल्याचे या विधानावरून दिसून येते, असे केसरकर म्हणाले. राज्यपालांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
संजय राऊत यांची ट्विटरवरून टीका
महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. थोडा जरी अभिमान असेल तरी राज्यपालांचा राजीनामा घ्या, नाहीतर शिवसेनेचे नावही घेऊ नका असा हल्ला खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चढवला आहे.
आणखी एका ट्वीटमध्ये राऊत म्हणाले, आता तरी, ऊठ मराठ्या ऊठ, शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजप राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल. असा टोला त्यांनी शिवसेनेतून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या खासदार, आमदारांच्या गटाला लगावला आहे.
थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला आहे.
काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी, आणि आता काय हा मराठी माणूस, महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
काँग्रेसनेही केली टीका
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत म्हणाले की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.