आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. या वक्तव्यावर चौफेर टीका सुरू झाल्यावर कोश्यारींनी स्पष्टीकरण दिले आहे. आपले वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचं ते म्हणाले.
वादानंतर राज्यपालांचा खुलासा
29 जुलै 2022 रोजी अंधेरी मुंबईतील चौकाच्या नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाषण केले होते. यावेळी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. खुलासा करताना राज्यपाल म्हणाले की, "मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे, ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. या भूमीवर राज्यपाल म्हणून मला छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे. यामुळे मी फार कमी वेळात मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला."
मराठी माणसाला कमी लेखण्याचा हेतू नव्हता
ते पुढे म्हणाले की, "मी काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात जे विधान केले, त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानाबद्दल बोललो. मराठी माणसांनी कष्ट करून महाराष्ट्र घडवला. त्यामुळेच आज अनेक मराठी उद्योजक प्रसिद्ध आहेत. ते केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात मराठीचा झेंडा मोठ्या प्रमाणावर उंचावत आहेत. त्यामुळे मराठी माणसाच्या योगदानाला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
नेहमीप्रमाणे विधानाचा विपर्यास
राज्यपाल पुढे म्हणाले की, पण नेहमीप्रमाणे माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मराठी माणसांच्या मेहनतीचा वाटा सर्वाधिक आहे. अलीकडे प्रत्येक गोष्ट राजकीय प्रीझममधून पाहण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक करणे म्हणजे दुसऱ्या समाजाचा अपमान नाही. राजकीय पक्षांनी विनाकारण यावरून वाद निर्माण करू नयेत. निदान मराठी माणसाचा तरी माझ्याकडून अपमान होणार नाही. विविध जाती-जमातींनी बनलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत आणि विकासात प्रत्येकाचे योगदान असून मराठी माणसांचे योगदान अधिक असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले.
काय म्हणाले होते राज्यपाल?
राज्यपाल कोश्यारी कार्यक्रमात म्हणाले होते की, "कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलंच जाणार नाही.” येथे वाचा संपूर्ण बातमी
काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादीकडून निषेध
राज्यपालांच्या वक्तव्याचा काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीनेही निषेध नोंदवला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करून तसेच पत्रकार परिषदेतही राज्यपालांवर टीकेची झोड उठवली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत तसेच जयराम रमेश, नाना पटोले यांनीही या वक्तव्यावर आक्षेप घेतला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं माध्यमांना सांगितलं.
राज ठाकरेंचं खरमरीत पत्र
मराठी माणसाला डिवचू नका, असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते. त्यावर आता राज ठाकरेंनी तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलू नका म्हणत पत्र लिहित कोश्यारींचा खरपूस समाचार घेतला आहे. येथे वाचा पूर्ण बातमी
फडणवीसांनी दर्शवली असहमती
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्राच्या विकासामध्ये व वाटचालीमध्ये मराठी माणसांचे जे कार्य व श्रेय आहे, ते सर्वाधिक आहे. उद्योगाच्या क्षेत्रासह जगभरात मराठी माणसांचे नाव मोठे आहे,' असे ते म्हणाले. येथे वाचा पूर्ण बातमी
राज्यपालांची केंद्राकडे करणार तक्रार - केसरकर
शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे कोश्यारींच्या बाजूने अशी विधाने येणार नाहीत, असे निर्देश केंद्राने द्यावे. मुंबईच्या निर्मितीत प्रत्येक समाजाचा वाटा आहे. यात मराठी माणसांचाही मोठा वाटा आहे. मुंबईच्या औद्योगिक विकासात पारशी समाजाचे मोठे योगदान आहे. राज्यपालांना मुंबईबाबत फारच कमी माहिती असल्याचे या विधानावरून दिसून येते, असे केसरकर म्हणाले. राज्यपालांनी राज्याच्या भावना जपल्या पाहिजेत. राज्यपालांच्या वक्तव्यावर मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. येथे वाचा पूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.