आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील कार्यक्रमात ठाकरे सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कान टोचले. तसेच ‘मोदी है तो मुमकिन है’चा दाखला देत राज्यातील अपूर्ण कामांबरोबरच औरंगाबादचा पाणीप्रश्न पंतप्रधानांनी सोडवावा, अशी मागणीही केली. तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांसाठी उभारलेल्या नव्या निवासस्थानावरून टोमणे हाणले.
मलबार हिल येथील राजभवन इमारतीच्या बंकरमध्ये ‘क्रांती गाथा’ या भूमिगत दालनाचे तसेच जलभूषण या नवीन इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (१४ जून) उद्घाटन झाले. या कार्यक्रमात राजभवन आणि वर्षा यांच्यात अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षनाट्याचा नवा अंक पाहावयास मिळाला. कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, ‘राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत विकास महामंडळांवरील नियुक्त्या झाल्या नाहीत. राज्यातील अनेक सिंचन योजना अपूर्ण आहेत. मी औरंगाबादला गेलो होतो. तिथल्या लोकांनी सांगितले की पाच ते सात दिवसांतून एकदा पाणी येते. आता तुम्हीच राज्यातील रेंगाळलेल्या योजना पूर्ण करा,’ असे कोश्यारी यांनी पंतप्रधानांना साकडे घातले.
महाराष्ट्रातील संतांनी देशाला ऊर्जा दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रांनी देशाला प्रेरित केले आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा आदी संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. आज दरबार हॉलमधून समुद्राचा विस्तार दिसतो तेव्हा मला स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांच्या वीरतेचे स्मरण होते.
आदित्य यांना वाहनातून उतरवण्याचा प्रयत्न
पंतप्रधान मोदी यांचे देहू येथून मुंबईत ४ वाजता आगमन झाले. आयएनएस शिक्रा तळावर मोदींचे स्वागत करणाऱ्या व्हीआयपींच्या यादीत आदित्य ठाकरेंचे नाव नव्हते. पंतप्रधानांची सुरक्षा पाहणाऱ्या एसपीजीने आदित्य यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरण्यास सांगितले. मुख्यमंत्री जवानांना म्हणाले की, आदित्य केवळ त्यांचा मुलगा म्हणून नाही तर राजशिष्टाचार मंत्री म्हणून आले आहेत. त्यानंतर आदित्यही मोदींच्या स्वागतासाठी पोहोचले होते.
अदलाबदली करता काॽ
मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपालांना नव्या निवासस्थानावर टोमणा मारला. ‘या वास्तूचे जसे नूतनीकरण झाले, तसेच राज्यपालांच्या नव्या निवासस्थानाचे उद्घाटन झाले आहे,’ असे बोलत राज्यपाल कोश्यारींकडे बघत म्हणाले, ‘तुम्ही, खूप चांगली इमारत बनवली आहे. अदलाबदली करायची का?,’ असे विचारताच उपस्थितांमध्ये हास्याचे तुषार उडाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.