आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ठाकरेंचे प्रत्युत्तर:राज्यपालांनी मुख्यमंत्रांना हिंदुत्वाची करुन दिली आठवण, उद्धव ठाकरे म्हणाले - 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही'

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत हिंदुत्वावावरुन डिवचले होते. आता यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उत्तर दिले. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे म्हणत त्यांनी खोचक शब्दांमध्ये त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रात काय म्हणाले होते राज्यपाल?
हिंदुत्वाचे आपण खंदे पुरस्कर्ते आहात. धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यासाठी आपल्याला कोणतीही दैवी सूचना मिळतेय की तुम्ही ज्या शब्दाचा तिरस्कार करत होता, ती ‘धर्मनिरपेक्षता’ तुम्ही अंगिकारली? आहे' असा उपरोधिक सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विचारला होता.

यावर कडाडले उद्धव ठाकरे
'माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही असे म्हणत त्यांनी राज्यपालांना सुनावले आहे.

हिंदुत्वाविषयी बोलताना ठाकरे म्हणाले की, माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. तसेच हिंदुत्वाविषयी तुम्हाला असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपणास वाटते का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? असा उलट सवालही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी लिहिलेले पत्र

माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी - जय महाराष्ट्र , महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.