आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:ग्रामपंचायत प्रशासकाचा बाजार, 11 हजारांत ग्रामपंचायतीचे प्रशासक पद; राष्ट्रवादीचे जाहीर पत्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुणे जिल्हाध्यक्षाने काढले पत्र, पक्षाकडून सारवासारव

राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी एक पत्र जारी केले असून जे इच्छुक पक्षाच्या बँक खात्यात ११ हजार रुपये भरतील त्यांचीच निवड होईल, असे जाहीर करत ग्रामपंचायत प्रशासकाचा चक्क बाजार मांडल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. १९ जिल्ह्यांतील १४ हजार ४०० ग्रामपंचायतींच्या डिसेंबर २०२० पर्यंत ५ वर्षांची मुदत संपुष्टात येत आहे. सध्या कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे निवडणुका घेणे शक्य नाही. म्हणून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय १३ जुलै रोजी ग्रामविकास विभागाने जारी केला आहे. या नियुक्त्या पालकमंत्र्यांच्या शिफारशीने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

ग्रामविकास विभाग राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या पत्राचा गवगवा होताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्षांनी असे पत्र पाठवले होते, हे मान्य केले. मात्र, हा निर्णय पक्षाचा नव्हता, तसेच सदर पत्र मागे घेण्यात येत असल्याची सारवासारव केली आहे.

प्रशासक नियुक्तीचा निर्णय मागे घ्या

प्रशासक नियुक्तीसाठी थेट ११ हजार रुपयांची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादीने सरळसरळ ग्रामपंचायतीच्या प्रशासकाचा बाजार मांडला आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे घ्यावा. - माधव भंडारी, प्रवक्ते, भाजप.

..तर जमेल ८२ लाखांची माया

पुणे जिल्ह्यात ७५० ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी किमान एकाने ११ हजार रुपये दिल्यास त्याची रक्कम ८२ लाख ५० हजार रुपये एवढी जमा होईल. विशेष म्हणजे निवड न झाल्यास हे पैसे परत मिळणार नाहीत, असेही पत्रात नमूद आहे.