आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेय:काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊनही भाजप नंबर वन : फडणवीस

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निकालावरून भाजप अन् महाविकास आघाडीच्या नेत्यांचे परस्परविरोधी दावे
  • भाजपची आकडेवारी, दावे खोटे, खुल्या दिलाने पराभव स्वीकारा : थोरात

राज्याची ग्रामीण जनता महाविकास आघाडीला कंटाळली असून सर्वाधिक ग्रामपंचायतींमध्ये बहुमत देऊन भाजपला क्रमांक एकचा पक्ष बनवल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. तर महाविकास आघाडीच्या सर्वाधिक ग्रामपंचायती निवडून आल्या असून आघाडी सरकारचा प्रयोग राज्यातील जनतेने स्वीकारला आहे, असे आघाडीचे नेते म्हणाले.

अजित पवार : राष्ट्रवादी

गावकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना केले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. या निवडणुकीतील सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बाळासाहेब थोरात : काँग्रेस

ग्रामपंचायत निकालातून राज्यभरात झालेली भाजपची पीछेहाट हे त्यांच्या धोरणांचे अपयश आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव स्वीकारावा.

देवेंद्र फडणवीस : भाजप

भाजपला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. कोरोनाकाळात, लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी खंबरपणे उभे राहिले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसह कुणालाही मदत केलेली नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या महाविकास आघाडी सरकारविरोधात रोष आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येऊनही भाजप नंबर वनचा पक्ष बनला.

नारायण राणे : भाजप

सिंधुदुर्गात ७० पैकी ४७ ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. शिवसेनेच्या ७० पैकी २१ जागा आल्या. राज्यात निकालात शिवसेना थोडी पुढे असेल, पण आमचे १०५ आमदार आहेत. शिवसेनेचे ५६ आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद कमी होते आहे.

आदित्य ठाकरे : शिवसेना

महाविकास आघाडी एकजुटीने काम करत आहे. कोरोनाला सरकार समर्थपणे सामोरे गेले व आजही या साथीशी लढा देत आहे. एकेक गोष्ट लोकांसाठी संयमाने खुली करत आहोत. उद्योग, पर्यावरण, सगळ्याच बाबतीत आपण पुढे चाललो आहोत. महाराष्ट्र चांगल्या हातात असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. आजच्या निकालांत त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. गावअसो, शहर असो वा कोणत्याही जिल्ह्यात, महाविकास आघाडीवरच जनतेचा विश्वास असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

चंद्रकांत पाटील : भाजप

भाजपचे ठळक यश म्हणजे शरद पवारांचे दत्तक गाव भाजपने जिंकले. जयंत पाटील यांची सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत भाजपने जिंकली. अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात ५२ पैकी ४० गावांमधील ग्रामपंचायती जिंकल्या. एकनाथ खडसे यांच्या गावची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यात आली.

बातम्या आणखी आहेत...