आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभर जाहीर सभा घेऊन भाजपविरोधात वातावरण निर्मितीचे प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीतच बिघाडीची चिन्हे आहेत. यापूर्वी शरद पवार, अजित पवार यांनी काँग्रेस, उद्धव सेनेच्या भाजपविरोधी भूमिकेशी विसंगत वक्तव्ये करून संशयाचे वातावरण निर्माण केले होते. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांच्यात वाक्युद्ध सुरू झाल्याने आघाडीची वज्रमूठ आवळण्यापूर्वीच सैल होत आहे. हे संशयाचे धुके दूर करण्यासाठी मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी चर्चा केली, तर आता काँग्रेसचे केंद्रीय नेते के.सी. वेणुगोपालही मुंबईत येऊन ठाकरे व पवारांशी चर्चा करणार आहेत.
गोंदिया बाजार समितीत राष्ट्रवादी-भाजपची हातमिळवणी
गोंदिया बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी केल्याने पटोले-पवार वाद पेटला. ‘जो भाजप शेतकरीविरोधी धोरण आखतो त्याच्याशी आम्ही एकाच विचाराने लढत असताना राष्ट्रवादीला युती करण्याची गरजच काय? तसे केले तर राष्ट्रवादीही शेतकरीविरोधी होईल,’ असे पटोले म्हणाले.
अजित पवारांनी दिले प्रत्युत्तर, म्हणाले- चर्चेतून मार्ग निघेल
प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले,‘काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अशा वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत अंतर निर्माण होऊ शकते. त्यांनी आपले म्हणणे मीडियाकडे मांडण्याऐवजी आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा माझ्याशी, उद्धव किंवा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडायला हवे. चर्चेतून मार्ग निघू शकतो ना. टाळी एका बाजूने वाजत नाही. पण अशा बातम्या आल्या की आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात पडतात. हे प्रकार बंद व्हायला हवेत. महाविकास आघाडीची सभा होईल त्या वेळी या गोष्टी मी मांडणार आहे.
पवारांच्या या टीकेला पटोलेंनी लगेचच प्रत्त्युत्तर दिले. ‘कदाचित अजितदादांना माहिती नसेल, पण मी जयंत पाटलांशी याबाबत आधीच चर्चा केली आहे. भाजपला मदत होईल अशी त्यांची भूमिका आम्हाला कदापि चालणार नाही.’ दरम्यान, नंतर एक प्रसिद्धिपत्रक काढून महाविकास आघाडीत कुठलेही वाद नसल्याची सारवासारव पटोलेंनी केली.
आघाडी भक्कमच, विरोधक धास्तावले - नाना पटोले : महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमूठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ एप्रिलला नागपुरात, नंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. आमच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत. त्यामुळेच ते आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार करत असल्याचा आरोपही पटोलेंनी केला.
काँग्रेस इलेक्शन मोडवर
17 वरिष्ठ नेत्यांनी समन्वय समिती नेमली
राष्ट्रवादीविरोधातही आक्रमक झालेली काँग्रेस आता इलेक्शन मोडवर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात १७ जणांची समिती नेमली. यात बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, अतुल लोंढे, संध्या सव्वालाखे, देवानंद पवार, प्रमोद मोरे व अमरजित मनहास यांचा समावेश आहे.
भाजपही सतर्क : मविआतील बिघाडीच्या हालचालींवर अमित शहांचे दिल्लीतून लक्ष
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत निर्माण झालेल्या बेबनावाचा फायदा घेण्यासाठी भाजप सतर्क झालाय. उद्धव ठाकरे-शरद पवार यांच्या भेटीनंतर लगेचच आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून या घडामोडींची माहिती दिली. 16 एप्रिल रोजी शहा मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर ते प्रत्येक घडामोडीची इत्थंभूत माहिती घेत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.