आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची शक्यता:आजही राज्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; नाशिक, मुंबईसाठी पुढचे तीन तास महत्त्वाचे

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचे धुमशान सुरू आहे. गुलाब चक्रीवादळामुळे तयार झालेल्या तीव्र कमी दाबामुळे मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दिसतोय. दरम्यान पावसाने रौद्ररूप धारण करत मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे आणि मुंबई, ठाणे परिसराला चांगलेच झोडपून काढले. आता हवामान विभागाने आज देखील इशारा दिला आहे. येत्या 24 तासांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच नाशिक, मुंबई, ठाणे येथेही येत्या तीन तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. मंगळवारी रात्री देखील मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस सुरूच होता. आज पहाटे देखील मुंबईमध्ये पाऊस सुरूच आहे. येत्या 3-4 तासांमध्ये वेगवान वारे आणि पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यासोबतच ठाणे, नाशिक, पालघर, नंदूरबार, अहमदनगर या जिल्ह्यांसाठीही पुढचे तीन ते चार तास महत्त्वाचे असणार आहेत.

हवामान विभागाने माहिती दिली आहे की, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, अहमदनगर, नंदूरबार, धुळे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच याकाळात वेगवान वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नाशिकातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गेल्या 24 तासांपासून नाशिकमध्येही जोरदार पाऊस बरसत आहे. गंगापूर धरणामधून 5 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्स करण्यात आला आहे. यानंतर नाशिकच्या गोदा घाट परिसरामध्ये पाणी वाढले आहे. रामकुंड परिसरामधील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले आहे. यासोबतच अनेक मंदिरे देखील पाण्याखाली गेलेली आहेत. संध्याकाळनंतर आणखी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...