आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे सरत्या वर्षात पर्यटन जवळपास ठप्प झाले. त्याचा फटका या पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला. मात्र, नव्या वर्षात हे चित्र बदलेल आणि पर्यटनस्थळे पुन्हा गजबजतील, अशी आशा या क्षेत्रातील व्यावसायिकांना आहे. राज्यांतर्गत पर्यटनाला लोक अधिक पसंती देतील, मात्र पर्यटनाचा कालावधी कमी असेल आणि त्यासाठी सार्वजनिक वाहतुकीपेक्षा स्वत:च्या किंवा भाड्याच्या वाहनांना प्राधान्य दिले जाईल, असे चित्र दिसते आहे.
कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन, बंद झालेली आंतरराष्ट्रीय उड्डाणे, विविध राज्यांच्या सीमांवरचे प्रवेश निर्बंध, सार्वजनिक तसेच खासगी वाहनांवरील बंदी अशा विविध कारणांमुळे गेल्या नऊ महिन्यांपासून पर्यटन जवळपास बंदच आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष आगमनाच्या निमित्ताने तसेच शासकीय पातळीवर अंशत: सुरू झालेल्या सेवा यामुळे लोक भीतीच्या सावटापासून काहीसे मुक्त झाले असून छोट्या सहलींसाठी बाहेर पडू लागले आहेत. ही संख्या हळूहळू वाढत जाईल, असे निरीक्षण पर्यटन व्यावसायिकांनी नोंदवले आहे.
पर्यटन क्षेत्राचे जाणकार असलेले ‘गिरिकंद ट्रॅव्हल्स’चे संचालक अखिलेश जोशी यांच्या मते, कोरोनाची तीव्रता कमी झाल्याने लोक आता बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आले आहेत. मात्र, त्यांचा भर वैयक्तिक प्रवास, सहलींकडेच आहे. समूहाने सहल करण्याची मानसिकता अद्याप आलेली नाही. २०२१ या वर्षातही ही धारणा टिकून राहण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे वैयक्तिक वाहन नाही असे पर्यटक ट्रॅव्हल्स कंपन्यांकडे गाड्यांचे आरक्षण करीत आहेत. त्यातही स्वत:च्या कुटुंबापुरती छोटी सहल करण्याचाच ट्रेंड दिसत आहे. १४ ते २१ दिवसांच्या मोठ्या सहलींची मागणी घटली आहे. जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसांच्या सहलीचा ट्रेंड नव्या वर्षात सुरू होईल. शिवाय, सुरक्षा, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या ब्रँडेड हॉटेल्सची मागणी वाढेल.
गेल्या वर्षीपर्यंत असणारा आठवडाभराच्या भटकंतीचा ट्रेंड आता बदलेल, असे वन्यजीव पर्यटन क्षेत्रातील अनुभवी ‘वाइल्ड’ संस्थेच्या शेखर नान्नजकर यांना वाटते. या क्षेत्रातील एक ते दोन दिवसांच्या भटकंतीसाठी विचारणा होत आहे. दूरची अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानांएेवजी जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणांची निवड होत आहे. शक्यतो दोनशे किलोमीटरच्या परिघातील स्थळांना प्राधान्य दिले जात आहे. ग्रुप छोटा ठेवण्याकडेही कल दिसत आहे.
नव्या वर्षात बदलणार ट्रेंड
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.