आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथिएटरमध्ये जाऊन 'हर हर महादेव' चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना झालेली मारहाण ही लांच्छनास्पद आहे, असे कृत्य करणाऱ्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी केली.
ठाण्यात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विवियाना मॉलमधील 'हर हर महादेव' चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावर दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
सेन्सॉर बोर्डाला पुरावे दिले
अभिजित देशपांडे म्हणाले, काल ठाण्यात प्रेक्षकांना शिवीगाळ झाली. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांचे कपडे फाडले. हा प्रकार लांछनास्पद आहे. या घटनेची आम्ही तीव्र निंदा करतो. स्वत:ला जे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त म्हणता त्यांच्याकडून असे हल्ले होणे, हे अशोभनीय आहे.
देशपांडे म्हणाले, चित्रपटातील ज्या दृश्यांवर आक्षेप घेतला जात आहे, त्याबाबत आम्ही सेन्सॉर बोर्डाकडे सर्व पुरावे दिलेल आहेत. तसेच, आमच्या टीमकडून आज दुपारी या वादग्रस्त मुद्द्यांवर सविस्तर स्टेटमेंट जारी केले जाणार आहे.
बाजीप्रभूंचे शिवाजी महाराजांसोबत युद्ध
चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांमध्ये युद्ध दाखवले गेले आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेत दोघांमध्ये असे युद्ध झालेच नसल्याचे म्हटले आहे. यावर अभिजीत देशपांडे यांनी सांगितले की, चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डानेही आम्हाला हा प्रश्न विचारला होता. मात्र, काही बखरी तसेच पुस्तकांमध्येही दोघांमध्ये युद्ध झाल्याचा संदर्भ मिळतो. महाराष्ट्राचे पुरोगामी इतिहासकार केळूसकर गुरुजी यांनी आपल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला आहे. 1905 मध्ये हे पुस्तक आले होते.
बखरी, पुस्तकांचा दाखला
अभिजित देशपांडे म्हणाले की, केळूसकर यांना सत्यशोधक इतिहासकार म्हटले जायचे. त्यांनी महात्मा फुलेंवर जे पुस्तक लिहिले ते वाचूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतली होती. त्यामुळे त्यांच्याच पुस्तकात बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांमधील युद्धाचे जे चित्रण केले आहे, ते तसेच्या तसे चित्रपटात घेतले आहे. हेच पुरावे आम्ही सेन्सॉर बोर्डालाही सबमीट केले होते. सेन्सॉर बोर्डात इतिहासकारही असतात. आम्ही सादर केलेल्या पुराव्यांवर त्यांचे समाधान झाल्यानेच आम्हाला प्रदर्शाची परवानगी मिळाली.
हा राजांचा अपमान
अभिजित देशपांडे म्हणाले, चित्रपटातील एखादे दृश्य पटले नाही तर त्यावर डिबेट, चर्चा होऊ शकते. मात्र, थिएटरमध्ये जात मराठी प्रेक्षकांनाच मारहाण करणे हे चुकीचे आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणले, त्यांचा हा अपमान आहे. आरोप करणाऱ्यांनी आधी चित्रपट तरी पहावा. चित्रपटात काहीही चुकीचे दाखवलेले नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.