हर हर महादेव चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रसारित करू नका:अन्यथा झी मराठीचे कार्यालय फोडू; संभाजी ब्रिगेडचा आक्रमक इशारा
हर हर महादेव चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रसारित करू नका, अन्यथा झी मराठी वाहिनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. चित्रपटामध्ये दाखवलेल्या काही घटना या इतिहासाची मोडतोड करुन दाखविण्यात आल्या आहेत, असा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडचा विरोध नेमका का?
- मराठी शब्दांचा वापर वारंवार घेण्यात आला, का मराठा साम्राज्य म्हणायची लाज वाटत होती का ?..
- हा चित्रपट कोणत्या साधनांवर अवलंबून प्रकाशित करण्यात आला आहे..?
- संपूर्ण बारा मावळ मध्ये बाजी प्रभू देशपांडे हेच एकमेव लढावू होते का..?
- बांदलांच्या कारभारात एक पाटील 60 मुली बाळींवर बलात्कार करतो आणि बांदल त्याला पाठीशी घालतात.. हे कुठल्या आधारे दाखवलं..?
- छत्रपती शिवाजी महाराजांनी समेट करण्याच्या बाबतीत बांदलांशी केलेल्या पत्र व्यवहारात बाजीप्रभू देशपांडे यांच्या उल्लेख आढळतो का...?
- चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बाजीप्रभू व छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कोणती लढाई झाली होती..?
- जेधे आणि बांदल घराण्याचे वैर होते पण,बकरी चोरण्यावरून बांदल जेधे एकमेकांची मुंडकी मारायचे..? इतक विकृत स्वरूप होत का...?
- अफजल खानाच्या वधाच्या वेळी बाजीप्रभू देशपांडे तिथं होते का..?
- अफजल खान डावखुरा होता की उजवा होता हे शिवाजी महाराजांना खाजगीत सांगणारा बाजीप्रभू देशपांडे हा कुठल्या आधारे दाखवला..?
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा काही प्रोटोकॉल असतील.. हे सुद्धा सध्याच्या फालतू डायरेक्टर लोकांना कळत नसावे का..? उठसूठ कोणीही सरदार शिवाजी महाराजांना खाजगीत जाऊन काहीही सांगू शकत होते का..? हे कोणत्या आधारे दाखवता..?
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाचे वर्णन असताना सुद्धा, तुम्हाला पांचट आणि नकटा सुबोध भावेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भेटला का..?
- सगळ्या सरदारांची भाषा ही रांगडी मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मात्र शुद्ध मराठी हे कोणत्या आधारावर..?
- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध नरसिंहासारखा पोट फाडून केला...? ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आणि लॉजिकली चुकीच्या आहेत त्या तुम्ही धडाधड मोठ्या पडद्यावर दाखवता ? यातून तुम्हाला काय साध्य करायच आहे..?
- मराठी हा शब्द कुठल्या इतिहासाच्या साधनात सापडतो..?आणि असे बरेच काही प्रश्न आहेत खोटा इतिहास घराघरात पोहचेल.
चित्रपट 18 डिसेंबरला झी मराठी वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे, तो प्रसारित करणे तात्काळ बंद करा. जर संभाजी ब्रिगेडला 10 डिसेंबरपर्यंत खुलासा केला नाही, तर संभाजी ब्रिगेड झी मराठी ऑफिसवर धडक कारवाई करेल त्या मुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी झी मराठी वाहिनी व प्रशासनाची असेल असे निवेदन संभाजी ब्रिगेड मुंबई तर्फे झी टॉकीज यांना देण्यात आले.
या वेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड मुंबई प्रदेश संघटक श्रीकांत गिरी,पालघर,ठाणे विभागीय अध्यक्ष डॉ योगेश पाटील,सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेश गुंड,वसई विरार महानगर अध्यक्ष प्रदीप मेस्त्री,उत्तर मुंबई जिल्हा सचिव आकाश गवळी,राम गवारी सामाजिक कार्यकर्ते,अकबर पन्हाळकर,माधव पाटील सामजिक कार्यकर्ते,असे अनेक संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थित होते