आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल:शरद पवारांच्या घरात घुसून चप्पलफेक, कर्मचाऱ्यांचे वकील अ‍ॅ​​​​​​​ड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक, चिथावणी दिल्याचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाच महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोडवरच्या “सिल्व्हर ओक’ निवासस्थानी धडक दिली. आझाद मैदानावर आंदोलन करणारे संपकरी अचानक येथे धडकले आणि त्यांनी पवारांच्या घराबाहेर आक्रमकपणे चप्पलफेक, दगडफेक केली. यामुळे काही काळ तणाव पसरला. दरम्यान, अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसही चक्रावले. याबाबत पोलिस तयारीत नसल्याने आंदोलक पवारांच्या निवासस्थानाबाहेर पाेहोचू शकले.

अ‍ॅड. सदावर्ते अटकेत : एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. आंदोलक सिल्व्हर ओकवर आले तेव्हा सदावर्ते सोबत नव्हते.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दाखल
ही माहिती मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये नरेंद्र राणे, मुंबई अध्यक्षा राखी जाधव, बबन कनावजे होते. एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणारेअ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते भाजपचे दलाल असून त्यांना सोडणार नाही, असा धमकीवजा इशारा राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी दिला.

१०५ आंदोलकांत ३४ महिला : आंदोलकांची संख्या सुमारे १०५ होती, त्यात ३४ महिला होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. एसटी संपकाळात आत्महत्या केलेल्या १२० एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे काय, असा प्रश्न आंदोलक विचारत होते. महिला आंदोलकांनी या वेळी पवारांच्या निवासस्थानासमोर बांगड्या फोडल्या.

१०७ अटकेत : १०७ आंदोलकांवर रात्री गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये रात्री गुन्हे दाखल झाले असून सर्वांना अटक केली आहे. त्यामध्ये १०५ आंदोलक सिल्व्हर ओकवरचे असून दोन आंदोलक आझाद मैदानावरचे आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते व वकील अ‍ॅ​​​​​​​ड. गुणरत्न सदावर्ते यांना रात्री पोलिसांनी अटक केली.
अचानक धक्कादायक आंदोलन, १०७ आंदोलक अटकेत

पोलिसांचे अपयश
१. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालू आहे तो परिसर आझाद मैदान पोलिस स्टेशनअंतर्गत येतो. प्रेस क्लब व मुंबई मराठी पत्रकार संघात आंदोलकांच्या पत्रकार परिषद होतात तरी पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाला खबर नव्हती.
२. आंदोलकांनी गुरुवारी संपाचा तिढा सुटल्याबाबत जल्लोष केला. त्यामुळे आंदोलन संपले अशी आमची अटकळ झाली. आम्ही गाफील राहिलो, असे गुप्तवार्ता विभागातील सूत्रांनी सांगितले.
३. याप्रकरणी मुंबई पोलिस (कायदा व सुव्यवस्था) सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी होणार आहे. समिती पोलिसांच्या अपयशाची कारणमीमांसा करेल.

आंदोलक सिल्व्हर ओकपर्यंत पोहोचलेच कसे ?
* आझाद मैदानावर वर्षभर आंदोलने असतात. मैदानात कायमस्वरूपी पोलिस चौकी आहे. आंदोलक सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काय ट्रीक वापरतात याची माहिती येथील पोलिसांना आहे.
* मैदानावर सीसीटीव्हीची निगराणी आहे. मात्र एसटी कर्मचारी तीन स्कूल व्हॅनमधून सिल्व्हर ओकला गेले. तेे आझाद मैदानातून गेले नाहीत. गाड्या दुसऱ्या गल्लीतील मेट्रो सिनेमाकडून भरल्याचे समजते.

नेता शहाणा नसला की कार्यकर्त्यांवर त्याचा दुष्परिणाम होतो : पवार
यात काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. एखादा नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर त्याचा दुष्परिणाम होतो याचे हे उदाहरण आपण आज पाहिले. राजकारणात मतभेद असतात, परंतु टाेकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही.
- शरद पवार, राष्ट्रवादी

पडद्यामागून काही शक्ती अशा हालचाली करत आहेत. त्यांना शोधून काढले पाहिजे.
- संजय राऊत, शिवसेना

ही घटना सर्वार्थाने चुकीची आहे. कोणत्याही पक्षाचा नेता असो, हा प्रकार योग्य नाही. मी निषेध करतो.
- देवेंद्र फडणवीस, भाजप

राज्यात अस्वस्थता पसरवण्याचे काम काही राजकीय शक्ती करत आहेत, चौकशी होईलच.
- दिलीप वळसे, गृहमंत्री

अ‍ॅ​​​​​​​ड. गुणरत्न सदावर्ते भाजपचे दलाल आहेत. त्यांनीच एसटी कर्मचाऱ्यांना सातत्याने भडकावले.
- नरेंद्र राणे, राष्ट्रवादी

सुप्रिया सुळे यांचे आवाहन
शरद पवार हाय हाय, जय श्रीराम, एक मराठा-लाख मराठा अशा घोषणा आंदोलक देत होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांची संख्या अधिक असल्याने ते निवासस्थानापर्यंत पोहोचले. या वेळी शरद पवार हे पत्नी प्रतिभा यांच्यासह घरीच होते. या वेळी सुप्रिया सुळे घराबाहेर आल्या व आंदोलकांना सामोऱ्या गेल्या. “कृपा करून शांततेचा मार्ग पत्करावा. दगडफेक करून आणि चपला आमच्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही. माझे आई-वडील, माझी मुलगी घरात आहे. पहिले त्यांची सुरक्षितता मला तपासू दे. सगळे जर शांत बसले तर मी पुढच्या क्षणी चर्चेला तयार आहे,’ असे सुळे यांनी आवाहन केले.