आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभरती परीक्षा:आरोग्य खात्याच्या भरती परीक्षा नव्याने होणार नाहीत : आरोग्यमंत्री राजेश टाेपे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यसेवक व ड्रायव्हर यांचा निकाल राखून; विरोधकांचा सभात्याग

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने २८ फेब्रुवारीस आयोजित महाभरती परीक्षांना एकूण ५४ संवर्गांतून १ लाख ३३ हजार विद्यार्थी बसले होते. त्यात झालेल्या गोंधळामुळे या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र गैरप्रकाराच्या तक्रारी काही निवडक संवर्गांच्या तसेच तुरळक केंद्रांवरील आहेत. यामुळे संपूर्ण परीक्षाच रद्द होणार नाहीत, असे स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत मंगळवारी दिले. कॉपीच्या तक्रारी आलेल्या आरोग्यसेवक आणि चालक या दोन संवर्गाचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. कॉपीप्रकरणी औरंगाबाद येथील सायबर कॅफेचा तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महापोर्टलद्वारे झालेल्या या परीक्षांसाठी ४ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १ लाख ३३ हजार परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. ३२ जिल्ह्यातील ८२९ केंद्रांवर ही परीक्षा झाली होती, मात्र तुरळक केंद्रांवरील तक्रारी आल्याचे ते म्हणाले. इलेक्ट्रिक लॉकमधील प्रश्नपत्रिका, जीपीएसद्वारे त्याच्या वाहतुकीचे ट्रॅकिंग आदी काळजी घेतल्याने गैरप्रकारांना आळा बसल्याचे ते म्हणाले. ब्लॅक लिस्टेड कंपनीस हे काम दिल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने या कंपनीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांचा हा खुलासा मंजूर न झाल्याने विरोधी पक्षाने या प्रश्नावर सभागृहात कामकाजावर बहिष्कार घालत सभात्याग केला.

परीक्षेबाबत तक्रारी आणि आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
तक्रार क्र. १ : औरंगाबादेत केंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिराने.
खुलासा
: एक गाडी नादुरुस्त झाल्याने व सर्व गाड्या एकत्र पोहोचण्याचा नियम असल्याने हा विलंब झाला होता. केंद्रांवर तेवढा वेळ वाढवून दिला.

तक्रार क्र. २ : परीक्षा केंद्रे उशिरा उघडण्यात आली.
खुलासा
: रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील २ केंद्रांवर हा प्रकार झाला. तेथेही वाढीव वेळ दिली.

तक्रार क्र. ३ : परीक्षा केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा.
खुलासा
: नाशिक शहर व राहुरीत हा प्रकार घडला. मात्र, गैरहजर विद्यार्थ्यांच्या जागेवर परीक्षांची व्यवस्था करून डिस्टन्सिंग पाळण्यात आले.

तक्रार क्र. ४ : राज्यात अनेक ठिकाणी कॉपीचे प्रकार घडले.
खुलासा
: प्रश्नसंच वेगवेगळे असल्याने हा प्रकार अशक्य.

तक्रार क्र. ५ : डमी उमेदवारांनी परीक्षा दिली.
खुलासा
: नगरमधील एका ठिकाणी हा प्रकार झाला होता. मात्र परीक्षा सुरू असतानाच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

पेपरफुटीमुळे २ निकाल राखून
औरंगाबादच्या एका केंद्रावर इअरफोन घातलेल्या परीक्षार्थीला पकडले होते. कोकणपुऱ्यातील सायबर कॅफेवर छापा घातला असता आरोग्यसेवक आणि ड्रायव्हर या संवर्गाच्या परीक्षांचे काही प्रश्न तेथे पोहोचल्याची माहिती मिळाली. सायबर गुन्हे शाखेतर्फे याचा तपास सुरू असल्याने वरील दोन्ही संवर्गांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील सुतार संवर्गासाठी एका सेंटरवर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याने तेथील पुन्हा परीक्षा होतील.

पुराव्यासह तक्रारी करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तत्काळ भरतीची गरज आहे. काही तक्रारींसाठी लाखो उमेदवारांना वेठीस धरता येणार नाही. तक्रारींची पूर्ण चौकशी केली आहे. कुणाच्या काहीही तक्रारी असल्यास पुरावे द्या, चौकशी करू. कोऱ्या प्रश्नपत्रिकांची तक्रार आलेली नाही. - राजेश टोपे, आरोग्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...