आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात ‘कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची अखेर बुधवारी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांची वर्णी लागली असून नगराळे यांनी सायंकाळी तत्काळ मुंबई पोलिस अायुक्तपदाचा पदभारही स्वीकारला.
अँटिलिया प्रकरणात सहायक पोलिस निरीक्षक वाझे यांचा हात असल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनअायए) तपासात समोर अाल्यानंतर वाझे यांच्यामागे असलेल्या ‘अदृश्य शक्ती’चा अाता शोध घेतला जात अाहे. या प्रकरणामुळे ठाकरे सरकार अाणि मुंबई पोलिसांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने गेल्या दोन दिवसांपासून आघाडीचे नेते, मंत्री यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. बुधवारी सकाळी पुन्हा ‘सह्याद्री’ विश्रामगृहावर अाघाडीच्या निवडक मंत्र्यांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गृहमंत्र्यांनी सोशल मीडियावर ‘सरकारचा मोठा निर्णय’ जाहीर केला.
वाझेंना ‘ऑपरेड’ करणारे सरकारमध्येच : फडणवीस
नवी दिल्ली | सचिन वाझे आणि परमबीरसिंग या खूप लहान कड्या आहेत, त्यांना ‘ऑपरेट’ करणारे महाराष्ट्र सरकारमध्ये बसले असल्याचा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केला. निलंबित झालेल्या आणि गंभीर प्रकरणात चौकशी सुरू असलेल्या वाझेंना पुन्हा पोलिस सेवेत घेण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी या वेळी केला. वाझे हे शिवसेनेसाठी वसुली अधिकारी म्हणून काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ख्वाजा युनूस एन्काउंटरप्रकरणी निलंबित वाझेंना पुन्हा पोलिस सेवेत घ्यावे यासाठी सन २०१८ मध्ये आपण मुख्यमंत्री असताना शिवसेनेने दबाव टाकला होता. वाझेला पुन्हा सेवेत घ्यावे म्हणून उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा आणि शिवसेनेचे मंत्री येेऊन भेटले होते, असा खळबळजनक गाैप्यस्फोट त्यांनी केला. मात्र, युनूस प्रकरणातील चौकशी आणि २०१७ मध्ये दाखल झालेला खंडणीचा गुन्हा या वाझेच्या पार्श्वभूमीमुळे तसेच अॅडव्होकेट जनरल यांच्या सल्ल्यानंतर आपण त्यास दाद दिली नसल्याचे ते म्हणाले. याच वाझेंना उद्धव सरकारने सत्तेवर येताच कोरोनाचे कारण सांगून “वसुली अधिकारी’ म्हणून पोलिस सेवेत घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
वाझेंना कुणाचा आशीर्वाद याच्या तपासाची मागणी : एनआयएने अटक केलेले वाझे किंवा बदली करण्यात आलेले मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग ही या कारस्थानातील छोटी नावे आहेत, त्यांच्यामागे कुणाचा आशीर्वाद आहे, सरकारमध्ये उच्च पदावर बसलेली कोणती व्यक्ती वाझेंना ऑपरेट करीत होती, याचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी तपास यंत्रणांना केले. कोरोनाचे कारण सांगून फक्त वाझेंनाच पुन्हा सेवेत घेण्यात येणे, दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करून कमी दर्जाच्या वाझेंना क्राइम इन्टेलिजन्स युनिटचे प्रमुख बनवणे आणि गेल्या वर्षभरातील अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांच्याकडे सोपवणे यामागे शिवसेनेची काय मजबुरी होती हे बाहेर यावे, अशी मागणी त्यांनी केली.
फडणवीसांचे आरोप :
२६-११ च्या हल्ल्यावेळी नगराळे यांचे धाडस, टेनिसचे चाहते
मुंबईतील २६-११ हल्ल्यावेळी ताज हाॅटेलजवळ ‘अारडीएक्स’ स्फोटकांनी भरलेली बॅग हस्तगत करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची अवघड व अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी हेमंत नगराळे यांनी पार पाडली होती. त्या वेळी ते ‘महावितरण’च्या दक्षता पथकाचे संचालक होते आणि दक्षिण मुंबईतील कुलाबा भागातील महावितरणच्या वसाहतीत राहत होते अन् ते स्वत:हून तिथे गेले होते. सन १९८७ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेले नगराळे गोल्फ आणि टेनिस खेळाचे निस्सीम चाहते आहेत. राष्ट्रपती पोलिस पदक, विशेष सेवा पदक व अांतरिक सुरक्षा पदकाचे ते मानकरी आहेत.
...म्हणून परमबीरसिंग यांना हटवले
महाराष्ट्राविरोधात भाजपचे षड्यंत्र
आधी कोरेगाव भीमा, त्यानंतर सुशांतसिंह आणि आता मनसुख हिरेन प्रकरणावरून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम भाजप करतो अाहे. केंद्रीय तपास यंत्रणांना पाळलेल्या पोपटाप्रमाणे वापरून महाराष्ट्राविरुद्ध षड्यंत्र रचणाऱ्या भाजपला जनता माफ करणार नाही. - नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
परमबीरसिंगांकडे संशयाची सुई
वाझे यांनी अँटिलिया स्फोटकांचे नाट्यही परमबीरसिंग यांच्या इशाऱ्यावरूनच केले, असा संशय एनआयएला असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी वाझे यांच्या केबिनमधून काही अत्यंत संवेदनशील दस्तऐवज एनअायएच्या हाती लागले. त्याशिवाय लॅपटॉप, आयपॅड आणि मोबाइलही जप्त करण्यात आला.
सरकारचा मोठा निर्णय
- गृहमंत्री अनिल देशमुख यांची सोशल मीडियावरील पोस्ट
सीआययू युनिटप्रमुख या नात्याने वाझेंची रिपोर्टिंग वरिष्ठ पोलिस निरीक्षक अथवा पोलिस उपायुक्तांकडे हवी होती, परंतु ती थेट परमबीरसिंग यांच्याकडेच होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.