आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊन सुरू असतानाही महाबळेश्वरला गेल्याप्रकरणी उद्योजक कपिल वाधवान यांना मुंबई हायकोर्टाने नोटीस बजावली आहे. जामीन देताना कोर्टाने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने अंमलबजावणी संचालनालयाने वाधवान यांच्याविरोधात अर्ज केला असता त्यावरील सुनावणीनंतर कोर्टाने वाधवान यांना नोटीस बजावली.
डीएचएफएलचे प्रवर्तक व मनी लाँडरिंग प्रकरणातील आरोपी कपिल वाधवान यांना दिलेला जामीन रद्द करण्यात यावा, अशी विनंती ईडीने मुंबई हायकोर्टात एका अर्जाद्वारे केली आहे. वाधवान यांना जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन झाले आहे तसेच राज्यात लॉकडाऊन सुरू असतानाही ते न जुमानता महाबळेश्वरपर्यंत प्रवास केल्याने त्यांचा जामीन रद्द करावा, असे ईडीने अर्जात नमूद केले आहे. ईडीच्या वतीने अॅड. पूर्णिमा कांथारिया यांनी हा अर्ज दाखल केला असून याप्रकरणी वाधवान यांना नोटीस बजावत कोर्टाने २३ एप्रिलला सुनावणी ठेवली आहे.
दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान यांना २७ जानेवारीला अटक करण्यात आली होती. मृत गँगस्टर इक्बाल मिर्चीशी असलेल्या कनेक्शनवरून ईडीने ही कारवाई केली होती. मनी लाँडरिंग कायद्याखाली वाधवान यांना अटक झाली होती. त्यानंतर मुंबईतील पीएमएलए कोर्टाने २१ फेब्रुवारीला वाधवान यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. महाराष्ट्र आणि देशात लॉकडाऊन सुरू आहे. सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील आहेत. असे असताना वाधवान, व कुटुंबातील अन्य सदस्य आणि नोकरवर्ग प्रथम मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्वर येथे पोहोचले. याप्रकरणी २३ जणांविरुद्ध महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.