आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलाॅक करा:मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर घंटानाद, मंदिरांच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाशिकमध्ये 165 पेक्षा अधिक ठिकाणी घंटानाद,
  • काेल्हापूर : हरीलाच बंदिस्त करून सरकार निद्रिस्त

जवळपास पाच महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे खुली करावीत, यासाठी आज विविध संंघटनांसोबतच भाजपने राज्यभरात घंटानाद आंदोलन केले. मुंबई, शिर्डी, पुणे, नाशिकमध्येही घंटानाद करत मंदिरे सुरू करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झाल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मिशन बिगिनअंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यांतील प्रमुख देवस्थाने खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिरे अथवा धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळे राज्यातील मंदिरे उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर | कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारातही घंटानाद आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे खुली करण्याची मागणी सातत्याने होते आहे. केंद्र सरकारनेही ४ जून २०२० रोजी नियमावलीसह परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार देशभरातील बहुसंख्य प्रमुख देवस्थाने सुरू झालेली आहेत. राज्यातही अंतर पाळून आवश्यक नियम, अटी-शर्तींसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक-भक्तांतून होत आहे. मात्र हरीलाच बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले असल्याचे भाजपने म्हटले आहे.

नाशिकमध्ये १६५ पेक्षा अधिक ठिकाणी घंटानाद

भक्तांना जेल, गुन्हेगारांना बेल.. उद्धव सरकार झाले फेल, दार उघड उद्धवा, दार उघड., मदिरा चालू मंदिर बंद.. अशा विविध घोषणांचे फलक हाती घेऊन मंदिरे उघडण्यासाठी शहरातील विविध मंदिरे व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात अाले. भाजपा नाशिक महानगर व आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे १६५ हून अधिक ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मंदिरासमोर, जैन मंदिर, गुरुव्दारा व बौध्द स्मारक परिसरात हे आंदोलन झाली. रामकुंडावर गंगा गोदावरी परिसर, कालिका मंदिराच्या बाहेर घंटानाद झाला. बाैद्ध स्मारक खुले करण्यासाठीही आंदाेलन झाले. गोंदवलेकर महाराज मंदिर, तुळजाभवानी मंदिर, विघ्नहर श्री गणेश मंदिर, श्रीराम मंदिर, श्री स्वामी समर्थ मंदिर, कालिका मंदिरआदींसह शहरात २७ ठिकाणी आंदोलन करण्यात आले..

सर्व धर्मीयांवर अन्याय : बावनकुळे

नागपूर | भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी शहर आणि जिल्ह्यात विविध मंदिरांमध्ये घंटानाद आंदोलन झाले. वर्धा रोड येथील साई मंदिरासमोर शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके तर भाजपाचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात कोराडी येथील महालक्ष्मी मंदिरात घंटानाद झाला. देशातील सर्व शासनाने मंदिरे सुरु करण्याची परवानगी दिली. पण महाराष्ट्र शासन मात्र सर्व धर्मियांवर अन्याय करीत असल्याचा अाराेप बावनकुळे यांनी या वेळी केला.

कळवणला सप्तशृंगी गडावर घंटानाद

श्रीक्षेत्र सप्तशृंगी निवासिनी देवस्थान खुले करण्यासाठी कळवणला घंटानाद आंदोलन करण्यात आले. खासदार डाॅ. भारती पवार, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली सप्तशृंगी गडाच्या पहिल्या पायरीवर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते गोविंद कोठावदे, विश्वास पाटील, सचिन सोनवणे, सोनाली जाधव, कृष्ण कुमार कामळस्कर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.