आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिवाळी अधिवेशन:आरक्षणासाठी आंदोलने, धरणे अन् गदारोळाने गाजला पहिला दिवस, कंगना रनौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य विधिमंडळाच्या दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस मराठा-धनगर आरक्षणासाठी आंदोलने, ठिय्या, धरणे आणि सभागृहातील गदारोळाचा ठरला. मराठा-धनगर आरक्षण, अतिवृष्टीची भरपाई आणि अधिवेशनाचा अल्प कालावधी याप्रकरणी विरोधकांनी सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेर महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा निकराने प्रयत्न केल्याचे दिसून आले. सभागृहाबाहेर मराठा आंदोलकांनी उग्र स्वरूप धारण केले. या गदारोळातच सुमारे २२ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सोमवारी दोनदिवसीय हिवाळी अधिवेशनास प्रारंभ झाला. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याबद्दल विरोधकांनी विधानसभेत सरकारला जाब विचारला. तसेच सरकार चर्चेपासून पळ काढत असून लोकशाहीला बेशुद्ध करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचा आरोपही विरोधकांनी केला. विधान परिषदेतही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. तसेच मराठा आरक्षणाची हेळसांड होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी वेलमध्ये येऊन सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत कामकाज बंद पाडले.

दुपारी दोन्ही सभागृहांतील कामकाज शोकप्रस्तावानंतर संपले. काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या शोकसभेचे विधिमंडळाशेजारी असलेल्या चव्हाण सेंटर येथे आयोजन केले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी पहिल्या दिवसाचे कामकाज केवळ तीन तासांतच आटोपते घेऊन पटेल यांच्या श्रद्धांजली सभेला हजेरी लावली. दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वादग्रस्त ट्वीटविरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पहिल्या दिवशी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे.

आझाद मैदानावर मराठा युवकांचे उग्र आंदोलन
विरोधकांचा गोंधळ सुरू असताना तिकडे आझाद मैदानात मराठा समाजाच्या युवकांचे उग्र आंदोलन चालू होते. या आंदोलकांनी सीएसएमटी टर्मिनसवर ठिय्या धरला होता. आंदोलकांच्या एका गटाने विधानसभेकडे कूच केली. या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापटही झाली.

नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी २५० कोटी
कोरोनाकाळात राज्याच्या विविध योजना मार्गी लावण्यासाठी २१ हजार ९९२ कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आल्या. यात नगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड आणि नागपूर-नागभीड रेल्वे मार्गांसाठी २५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पडळकर, रवी राणा यांचे लक्षवेधी निषेध
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशात येऊन सरकारचे धनगर आरक्षण प्रश्नाकडे लक्ष वेधले, तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी बाकावरील सदस्यांनी सरकारच्या निषेधार्थ धरणे धरले. या वेळी आंदाेलक आमदारांच्या हातात ‘वादळग्रस्त व शेतकऱ्यांना मदत न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’ असे बॅनर होते. तसेच बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सभागृहात चक्क फलक फडकावत सरकारचा निषेध व्यक्त केला.

आज सत्त्वपरीक्षा : आज अधिवेशनाचा दुसरा अन् शेवटचा दिवस आहे. तब्बल १० विधेयके मांडली असून ‘शक्ती’ हे बहुचर्चित विधेयक चर्चेविना मंजूर हाेते की प्रलंबित राहते याप्रकरणी सरकारची आज सत्त्वपरीक्षा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser