आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलन सुरूच राहणार:राज्यात दोन हजार ठिकाणी भाजपने केली वाढीव वीज बिलांची होळी, महाविकास आघाडी सरकार आले बॅकफूटवर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 युनिटपर्यंत वीज मोफत द्या, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

टाळेबंदी काळात वाढीव वीज देयकाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने सोमवारी (दि.२३) राज्यभर केलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. तब्बल दोन हजार ठिकाणी पार पडलेल्या या आंदोलनात लाखो भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. वाढीव वीज बिले रद्द करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा भाजपने दिला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कराड (जि. सातारा) येथे आंदोलनात भाग घेतला. सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर, वर्धा येथे आंदोलनात भाग घेतला. प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक येथे आंदोलनात भाग घेतला. पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, खासदार, आमदार, तसेच महापौर, ज़िल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शेकडो लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात भाग घेतला.

मुंबई प्रदेश भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुंबईत झालेल्या आंदोलनात आमदार अतुल भातखळकर, आमदार विद्या ठाकूर आदी नेते सहभागी झाले होते. कांदिवलीत भाजपने जोरदार आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेले आंदोलक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

नागपूर येथे आंदोलनात सहभागी होताना प्रदेश सरचिटणीस बावनकुळे म्हणाले, आपल्याच आश्वासनांना हरताळ फासणाऱ्या नाकर्त्या सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. टाळेबंदी काळात दुकाने, कार्यालये बंद होती तरी लाखा-लाखांची बिले अनेकांना पाठवण्यात आली. बिल भरले नाही म्हणून गोरगरिबांच्या घराचा वीजपुरवठा तोडण्यासाठी महावितरणचे अधिकारी गेले तर भाजप कार्यकर्ते त्यांना प्रतिबंध केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

१०० युनिटपर्यंत वीज मोफत द्या : पाटील

कराड येथे आंदोलनात सहभागी होताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, १०० युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याचे आश्वासन आघाडी सरकारने पाळले नाही. टाळेबंदीच्या काळात अनेकांना भरमसाट वीज बिले आली आहेत. या बिलांमध्ये सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण आता या सरकारने घूमजाव केले आहेत. जोपर्यंत वीज बिलांमध्ये सुधारणा करून दिली जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील, असा इशारा पाटील यांनी दिला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser