आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेला तपास येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या जातील, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. ८) विधानसभेत सांगितले. बीड जिल्ह्यातील ९४ देवस्थानांच्या जमिनी खालसा करण्याच्या प्रकरणांचीही चौकशी केली जाईल तसेच चुकीच्या पद्धतीने जमिनी हस्तांतरित केल्या असतील तर त्या देवस्थानाला परत कशा मिळतील याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यात हिंदू देवस्थान ट्रस्टच्या जमिनी हडप केल्याचे राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी निदर्शनास आणले. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते. मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला. हिंदू देवस्थान जमिनीच्या या प्रकरणाचा तपास एसीबी करत आहे. मात्र एसीबीकडून चालढकल होत आहे. गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही. हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जमिनी हडप करणारे कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी तसेच लवकरात लवकर देवस्थानांना जमिनी परत करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. या चर्चेच्या दरम्यान प्रकाश सोळंके, भाजपचे आशिष शेलार यांनीही सहभाग घेतला.
बीड जिल्ह्यामध्ये ३२ प्रकरणे उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले, बीड तालुक्यात ६, बीड शहरात ६, धारूर तालुक्यात २, गेवराई १, अंबाजोगाई ३, आष्टी १२, माजलगाव १, केज १ अशी जमीन गैरव्यवहाराची नवी प्रकरणे समोर येत आहेत. याची व्याप्ती वाढत असल्याने तपासाला वेळ लागत असल्याचे सांगून सरकार लवकरात लवकर कारवाई करेल, असे फडणवीसांनी आश्वासित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.