आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईडीचे काही अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप काही दिवसांपुर्वी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांचा समावेश असलेल्या विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त वीरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेल व त्यांना तपासासाठी जेवढा वेळ लागेल तेवढा देण्यात येईल, अशी माहिती आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी ईडीचे अधिकारी व भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. ईडीचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र नवलानी हे मुंबईत खंडणीचे रॅकेट चालवतात. त्यांनी 100 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली आहे. याचे पुरावेदेखील आपल्याकडे असून ते महाराष्ट्र पोलिस व केंद्र सरकारला देणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. तसेच, ईडीच्या या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भाजप नेत्यांशीही संबंध आहे. किरीट सोमय्या यांचा नवलानीशी काय संबंध आहे हे त्यांनीच सांगावे, असे राऊत म्हणाले होते. यासंदर्भात राऊत यांनी दिलेल्या पुराव्यांची दखल घेत मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून आता या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले.
राज ठाकरेंवर कारवाई होणार?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतेच गुढीपाडव्यावरून मशिद, मदरसे व भोंग्याबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. या वक्त्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील म्हणाले, राज ठाकरे यांच्या वक्तव्याची चौकशी केली जाईल. तपास करूनच त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईळ. तसेच समाजात तेढ निर्माण होईल, असे वक्तव्य आता कोणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
नाशिक पोलिस आयुक्तांना समज देणार!
नाशिकचे पोलिस आयुक्त पांडे यांनी नुकतेच महुसल अधिकारी हे प्रचंड वसुली करतात. ते आरडीएक्सप्रमाणे असल्याचे वक्तव्य केले होते. नंतर त्यांनी आपले वक्तव्य मागेही घेतले होते. मात्र, महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने असे बेजबाबदार वक्तव्य करू नये. काही तक्रार असल्यास राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात दाद मागावी. नाशिक पोलिस आयुक्तांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांना समज देणार असल्याचेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.