आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​ विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जि.प., महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये होमगार्डचा पहारा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शाळांमधून विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी गृहरक्षक दलाच्या जवानांची मदत घेतली जाणार असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी शाळांची यादी सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाच्या आयुक्त कार्यालयाला देण्यात आल्या आहेत.

राज्यात पुणे येथे शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याच्या घटनेनंतर राज्य शासनाने जिल्हा परिषदेसोबतच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सुरक्षेसंदर्भात गृहरक्षक दलाच्या जवानांची सेवा उपलब्ध करण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात, राज्य शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेसोबतच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सुरू होताना आणि शाळा सुटताना शाळेसमोर गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार किती शाळांना गृहरक्षक दलाच्या जवानांची आवश्यकता आहे याची तपासणी करून त्या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव शिक्षण आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. याशिवाय शासकीय शाळांमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या यंत्रणांच्या शाळांचा समावेश असल्याने जवानांना दिले जाणारे मानधन याबाबत निधी उपलब्धतेबाबत गृह विभागाशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल.

राज्यात गृहरक्षक दलाचे ४४ हजार जवान कार्यरत
राज्यामध्ये गृहरक्षक दलाचे एकूण ५३ हजार जवान असून त्यापैकी ४४ हजार जवान कार्यरत आहेत. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गृहरक्षक दलाच्या महासमादेशक कार्यालयाकडे मागणी नोंदवल्यानंतर तातडीने जवान उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...