आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:हॉटेल्स, माॅलच्या वेळांचा निर्णय पुन्हा लांबणीवर; नियमावली तयार करण्याचे कोरोना कृती दलास निर्देश

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजूनही राज्यात दैनंदिन ५ ते ६ हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळत असून दुसरी लाट केव्हाही तिसऱ्या लाटेत रूपांतरित होऊ शकते, त्यामुळे निर्बंधमुक्त २६ जिल्ह्यांत प्रार्थनास्थळे, माॅल, दुकाने आणि हाॅटेल यांना वेळ वाढवण्याची परवानगी देताना सांभाळून द्यावी, असा सल्ला कोरोना राज्य कृती दलाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृती दलाची बैठक सोमवारी रात्री पार पडली. या वेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉक्टर संजय ओक, डॉक्टर शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉक्टर झहीर विराणी, डॉक्टर राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉक्टर सुहास प्रभू, डॉक्टर अजित देसाई, ओम श्रीवास्तव, डॉक्टर उदवाडिया,अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास यांची उपस्थिती होती. या बैठकीत व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय झाला. मात्र राज्य अजूनही प्राणवायूबाबत स्वयंपूर्ण नाही, तसेच १६ टक्केच्या आसपास लसीकरण झालेले आहे, त्यामुळे तिसरी लाट हानीकारक असू शकते, असे कृती दलातील डाॅक्टर म्हणाले. टेस्टींग, ट्रॅकींग बरोबरच लसीकरणाचा वेग वाढवण्यावर चर्चा झाली.

बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने कृती दलाने शिथीलता देण्याबाबतची नियमावली तयार करावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव यांनी केली. दुसऱ्या लाटेतल्या चुकांवर चर्चा झाली. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेत त्या टाळण्याकडे लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. एकंदरच गतवर्षी प्रमाणेच यंदाही सणउत्सव साधेपणाने साजरे केले जावेत, अशी सूचना कृती दलाने केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तूर्त शाळा उघडू नयेत
राज्यातील ५९ टक्के नागरिकांमध्ये कोरोना अँटिबॉडीज आढळल्या आहेत. मात्र यावर तिसरी लाट थोपवणे शक्य नाही, असे सांगत अमेरिका, ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या स्थितीकडे डाॅक्टरांनी लक्ष वेधले. तसेच इतक्यात शाळा उघडू नयेत, अशी सूचना बैठकीत करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...