आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • How To Take The Exam? Big Question In Front Of Vice Chancellor; The State Government's Decision Today Regarding The University Final Year Examination

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना चिंता:परीक्षा घ्यायच्या कशा? कुलगुरूंसमोर यक्षप्रश्न; विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षेबाबत आज राज्य सरकारचा फैसला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑनलाइन अन् केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा घेणेही अवघड
  • केंद्राच्या आदेशानुसार शाळा-महाविद्यालये बंद असताना परीक्षा घ्यायच्या कशा?

मुंबई-पुण्याबाहेर पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा नसल्याने ऑनलाइन परीक्षा घेणे अवघड असल्याचे मत राज्यातील बहुतांश विद्यापीठांच्या कुलगुरूंनी व्यक्त केले आहे. राज्यातील अकृषक विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात कुलगुरू समितीची बैठक रविवारी दुपारी मुंबईत झाली. त्या वेळी परीक्षा घ्यायच्या कशा यासंदर्भात विचारविनिमय झाला. कुलगुरू समितीच्या अहवालावर राज्य सरकार आपला निर्णय आज (सोमवार) जाहीर करणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. कुलगुरू समितीच्या शिफारशीसंदर्भात राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्याशी प्रथम चर्चा करण्यात येईल. त्यानंतर अंतिम निर्णय विभागाकडून घेतला जाणार आहे, असे मंत्री सामंत म्हणाले.

दरम्यान, कुलगुरूंचा अहवाल उद्या येणार असून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर राखून व कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, मानसिक दडपण येणार नाही अशा पद्धतीने परीक्षांचे नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

केंद्राच्या आदेशानुसार शाळा-महाविद्यालये बंद असताना परीक्षा घ्यायच्या कशा?

केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले आहे. देशातल्या सर्व शाळा व महाविद्यालये लॉकडाऊनमुळे बंद ठेवा असे निर्देश दिले आहेत, तर दुसरीकडे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या म्हणते. शाळा-महाविद्यालये बंद असताना परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचे काय, असे ट्वीट सामंत यांनी केले.

मुंबई-पुणे विद्यापीठ वगळता इतरत्र पायाभूत सुविधांची कमतरता

१ पुणे व मुंबई विद्यापीठाकडे पायाभूत सुविधा आहेत. मात्र, इतर विद्यापीठांना ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण असल्याचे मत बहुतांश कुलगुरूंनी बैठकीत व्यक्त केले.

२ ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी सोमवारी कुलगुरूंच्या समितीची बैठक ठेवण्यात आली आहे.

३ कोरोनाची परिस्थिती बघता केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा घेणे अवघड असल्याचे कुलगुरूंचे म्हणणे आहे.

४ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा द्यायला लागू नये अशा पद्धतीने परीक्षा घेण्याकडे बहुतांश कुलगुरूंचा कल आहे.

५ कुलगुरू समितीचे अध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर आहेत. समितीत १३ विद्यमान कुलगुरू असून माजी कुलगुरू राजन वेळूकर आणि विलास खोले निमंत्रित सदस्य आहेत.

> कुलगुरू समितीचा उद्या सोमवारी बारा वाजेपर्यंत पहिल्या बैठकीचा अहवाल शासनाकडे प्राप्त होईल. त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करण्यात येईल.

सोरेन यांनी मागवल्या डॉक्टरांकडून सूचना

जेईई-नीट परीक्षा घ्याव्यात का याबाबत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी डॉक्टर, इंजिनिअर्स आणि विचारवंतांकडून सूचना मागवल्या आहेत. यावर मुख्यमंत्री सोरेने हे परीक्षांचे राजकारण करीत असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते प्रतुल सहदेव यांनी केली आहे.

छत्तीसगडमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वाहनसेवा

जेईई-नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार मोफत वाहन सेवा देण्याची तयारी करीत आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वाहनांची सोय करण्याचे निर्देश दिले आहेत.

एनएसयूआयचा सत्याग्रह

जेईई-नीट परीक्षा रद्द करण्यासाठी एनएसयुआयचा सत्याग्रह रविवारी पाचव्या दिवशीही सुरुच होता. देशभरातील विद्यार्थ्यांचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करावा, असे आवाहन एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंदन यांनी पंतप्रधान मोदींना केले आहे.