आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक अनलॉक:बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत, मुख्यमंत्र्यांनी पाहिले ऑनलाइन वर्गाचे प्रात्यक्षिक 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिना अखेरीस लावण्याचा प्रयत्न

निकालाकडे लक्ष लागून असलेल्या इयत्ता बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरला. कोरोनामुळे लांबलेला इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत आणि दहावीचा निकाल जुलै महिनाअखेरपर्यंत लागणार आहे, तर राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शालेय शिक्षण विभागाची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. या वेळी ही माहिती देण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन वर्गाचे प्रात्यक्षिक पाहून विद्यार्थ्यांशी संवादही साधला. त्या वेळी विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाडदेखील उपस्थित होत्या. पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक अभ्यासक्रम हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असल्याने त्याची सर्व उपकरणांवर कॉम्पॅटिबिलिटी असावी तसेच तो सहजरीत्या ऑफलाइनदेखील उपलब्ध झाला पाहिजे, असे सांगून या वेळी त्यांनी गुगल मीटवरील ऑनलाइन वर्गाचे प्रात्यक्षिक पाहिले.

१०, १२ वी निकालाची प्रक्रिया वेगाने सुरू : बारावीचे सर्व पेपर्स कोरोनामुळे लॉकडाऊनपूर्वी संपले होते, मात्र दहावीचा केवळ भूगोलाचा पेपर होऊ शकला नव्हता. आता निकाल लावण्यासाठी वेगाने प्रक्रिया सुरू आहे. ९७ टक्के उत्तरपत्रिका या कोरोना काळात परीक्षकांकडून जमा करण्यात आल्या असून स्कॅनिंगही वेगाने सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दीड महिना

दहावीच्या निकालानंतर सुमारे दीड महिना अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालेल. या वर्षापासून ऑनलाइन पोर्टलमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शुल्क भरणे, डिजिटल पुस्तिका, मोबाइल अॅप अशा सुविधा देण्यात येत आहेत. १ जुलैपासून महाविद्यालयांचे नोंदणी सत्र सुरू होईल, अशी माहिती या वेळी विभागाने दिली.

जिओ टीव्हीवर दोन वाहिन्या

जिओ टीव्हीवर प्रायोगिक तत्त्वावर दहावी आणि बारावीसाठी दोन वाहिन्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच या टीव्हीवर पहिली ते बारावी असे स्वतंत्र ५ वाहिन्यांचेसुद्धा नियोजन आहे असे सांगण्यात आले. दूरदर्शनकडेदेखील दिवसाला ४ ते ५ तास शैक्षणिक तास आयोजित करण्याचे नियोजन आहे, असे या वेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी स्थगित : उदय सामंत

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने जुलै, आॅगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर होतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.
असे हाेते परीक्षेचे वेळापत्रक : एमएएचटी-सीईटी ४ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत होणार होती, तर बीपीएड, एलएलबी, बीए/बीएस्सी, बीएड अभ्यासक्रमाच्या सीईटी २४ जुलै रोजी होणार होत्या.

बातम्या आणखी आहेत...