आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई रिसॉर्टशी संबंध नाही:अनिल परबांचे स्पष्टीकरण, म्हणाले - सोमय्या सुपारी घेऊन आरोप करतात, फौजदारी दावा करणार

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दापोलीतील साई रिसॉर्टशी माझा संबंध नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

तसेच, किरीट सोमय्या हे सुपारी घेऊन आरोप करतात. साई रिसॉर्टवर हातोडा घेऊन जाणे, ही त्यांची नौटंकी आहे. सोमय्यांवर आता फौजदारी दावा दाखल करणार, अशी टीका अनिल परबांनी केली.

साई रिसॉर्ट पाडण्यास आजपासून दापोली प्रशासनाने सुरूवात केली आहे. या कारवाईवर अनिल परबांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

मालक मी नाही

अनिल परब म्हणाले, साई रिसॉर्टचे मालक मी नव्हे तर सदानंद कदम आहेत. याप्रकरणी कोर्टातही केस सुरू आहे. रिसॉर्टचे मालक सदानंद कदम असल्याचे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. मात्र, किरीट सोमय्या जाणुनबुजून या रिसॉर्टशी माझा संबंध जोडून मला बदनाम करण्याचे काम करत आहेत.

कोर्टाचे 'जैसे थे'चे आदेश

अनिल परब म्हणाले, अनधिकृतपणे बांधकाम केले म्हणून साई रिसॉर्ट पाडण्यास आजपासून सुरूवात करण्यात आली आहे. मात्र, याप्रकरणी कोर्टानेच जैसे थै स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एक प्रकारे कोर्टानेच साई रिसॉर्टला कारवाईपासून संरक्षण दिले आहे. रिसॉर्टचे मालक सदानंद कदम माझे मित्रच आहेत. त्यांनीच मला ही माहिती दिली आहे. असे असूनही प्रशासन ही कारवाई करत आहे.

राणेंच्या बंगल्यावर जाणार का?

अनिल परब म्हणाले, रिसॉर्ट पाडण्यासाठी म्हणून माझे नाव घेत किरीट सोमय्या हातोडा घेऊन आज दापोलीत दाखल झाले. मला त्रास देणे, मविआची प्रतिमा खराब करणे, या हेतूनेच किरीय सोमय्या आरोप करत आहे. याच सोमय्यांनी शिंदे गटातील अनेकांविरोधातही आरोप केले होते. मात्र, त्यांच्याविरोधात ते आता एक शब्दही बोलत नाहीत. महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही. त्यांना सर्व समजत. सोमय्यांची एवढीच हिंमत असेल तर नारायण राणेंच्या बंगल्यावर ते हातोडा घेऊन ते का जात नाहीत. राणेंचा बंगालही अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

शासनानेच परवानगी दिली

अनिल परब म्हणाले, साई रिसॉर्टबरोबरच त्याच्या बाजुला असलेले आणखी एक रिसॉर्ट आज पाडण्यात येत आहे. त्या गरीब माणसाचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना त्याला त्रास दिला जात आहे. हे रिसॉर्ट बांधण्याची परवानगी शासनानेच दिली होती. परवानगी चुकीची असेल तर त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पाहीजे. मालकाला दोष देण्यात काय अर्थ आहे? तसेच, एकट्या रायगड जिल्ह्यात साई रिसॉर्टप्रमाणेच जवळपास 2007 रिसॉर्ट बांधण्यात आले आहेत. कायदा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळे या सर्व रिसॉर्टवर कारवाई करावी, अशी माझी आग्रहाची मागणी आहे.

फौजदारी दावा करणार

अनिल परब म्हणाले , सोमय्यांना त्यांच्या पक्षातच आता कोणी विचारत नाही. त्यामुळे ते सुपारी घेऊन काम करत आहेत. माझ्यावर खोटा फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. माझे निर्दोषत्व मी कोर्टात सिद्ध करेल. तसेच, सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा मी आधीच दाखल केला आहे. तरीही माझी वारंवार बदनामी करत असल्यामुळे सोमय्यांविरोधात मी आता फौजदारी दावाही दाखल करणार, असा इशाराही परबांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...