आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राबद्दल केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) निवेदन काढत माफी मागितली. ‘राजस्थानी आणि गुजराती लोकांना मुंबई आणि ठाण्यातून काढून टाकले तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी राहणारच नाही,’ असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावर राज्यपालांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर अनेक वेळा कोश्यारींनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. “समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल?’ असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारी अडचणीत आले होते.
राज्यपाल यांचा माफीनामा : ‘२९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाजबांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली.माझ्याकडून चूक झाली..
क्षमा करा : भगतसिंह कोश्यारी
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्ज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतिपथावर अग्रेसर होत आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पनादेखील मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.’ -भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल, महाराष्ट्र
वादग्रस्त वक्तव्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ जुलै रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. भाषणात राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते, “महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई आणि ठाण्यातून गुजराती किंवा राजस्थानी लोकांना काढून टाकले, तर तुमच्याकडे पैसेच उरणार नाहीत. मुंबई ही आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते, पण ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखलीच जाणार नाही.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.