आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलांचा अपमान करणारे मर्दानगी दाखवतात. मी ठाण्यातूनही लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत, असे थेट आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी दिले. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर महाविकास आघाडीने ठाण्यात बुधवारी ‘जनप्रक्षोभ मोर्चा’ काढला. या वेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. या वेळी सेना नेते विनायक राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, चोरांचा पक्ष नाही तर चोरांची टोळी असते. कालपासून मला लोकांच्या मनात संताप दिसत आहे, या गद्दारांच्या सरकारबद्दल राग दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही ठिणगी पडली आहे. हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही, तर काही तासांचं सरकार आहे. पडल्यानंतर आम्ही सगळ्यांची मोजमापं काढणार. जे कुणी अधिकारी त्या गद्दार गँगचे असतील त्यांना सांगतोय, मी सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार. तुम्हाला तुरुंगातही टाकणार.
रोशनी शिंदे यांच्यासोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेसंदर्भात उद्धव ठाकरे मंगळवारी ठाणे पोलिस आयुक्तालयात गेले असता आयुक्तांनी पळ काढला. फक्त एका पोस्टसाठी मिंधेंच्या लोकांनी महिलेला लाथा मारल्या. यावर पोलिस कारवाई करत नाहीत. पोलिस “वर्षा’वर बसून कुणावर कारवाई करायची हे ठरवतात, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
मुख्यमंत्री शिंदे यांची केली मिमिक्री
या वेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ते म्हणाले, शर्ट खालती-वरती करत, वर-खाली बघून दाढी खाजवत ते महिलांबद्दल अभद्र भाषा बोलतात. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हावभावावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अनेकांनी वन्स मोअरचे नारे दिले.
ठाकरेंनी माझी सुपारी दिली होती : राणे
ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर राज्यातील पॉलिटिकल वॉर सुरू झाला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी माझी सुपारी दिली होती, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणणारा स्वतः महाफडतूस आहे. आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात १५ टक्के कमिशन घेतले, असा आरोपही राणे यांनी या वेळी केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.