आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद:५ जागा लढवल्यास काँग्रेसला एका जागेचा फटका, म्हणून ‘महाविकास’चे ६ उमेदवार; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अंधुकच, विजयाचे गणित असे जुळवणार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने ६ उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्रीच उमेदवार असलेली आणि कोरोना महामारीदरम्यानची बहुचर्चित निवडणूक बिनविरोध होणार की नाही ही उत्सुकता आहे.     ‘परिषदेवर ६ उमेदवार निवडून आणण्याची आघाडीची क्षमता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आरामात निवडून येतील,’ असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शिवसेना व राष्ट्रवादीला ही निवडणूक बिनविरोध हवी आहे. मात्र ५ जागा लढवल्यास काँग्रेसचे एका जागेचे नुकसान आहे. त्यामुळे ६ उमेदवार रिंगणात उतरवावेत यासाठी काँग्रेसचा आग्रह आहे. मध्यंतरी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांना आपल्या कोट्यातून मते दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने परिषदेसाठी एक जागा घ्यावी व काँग्रेसला दोन जागा सोडाव्यात यासाठी काँग्रेस आग्रही आहे.

विधानसभेत ४४ आमदार असल्याने काँग्रेसला एक की दोन जागा येणार, हे अद्याप निश्चित नाही. पण, अशोक चव्हाण व बाळासाहेब थोरात गटाने मात्र त्यापूर्वीच आपापल्या पाठीराख्यांसाठी पक्षात लाॅबिंगला सुरुवातही केली आहे. चव्हाण गटाने प्रवक्ते सचिन सावंत आणि माजी मंत्री डी. पी. सावंत यांची नावे पुढे केली आहेत. थोरात गटाकडून पुण्याचे मोहन जोशी यांच्या नावाला पसंती असणार आहे. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही इच्छुक आहेत.

प्रदेश काँग्रेसने परिषदेवरील इच्छुकांचे अर्ज मागवले होते. हा अर्ज सादर करताना १० हजार रुपये अनामत रक्कम द्यायची होती. तरीही प्रदेश काँग्रेसकडे १०३ अर्ज आले. एकूण काँग्रेसमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी आहे.

विजयाचे गणित असे जुळवणार

एका आमदाराच्या मताचे मूल्य १०० पकडले जाते. एका उमेदवारास विजयासाठी २९०० मते हवीत. ६ उमेदवार निवडून आणायचे तर आघाडीकडे १७४ आमदार हवेत. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांचे संख्याबळ १५४ आहे. विश्वासदर्शक प्रस्तावात ठाकरे सरकारला १६९ मते मिळाली होती. स्वाभिमानी पक्ष, समाजवादी, प्रहार जनशक्ती, शेतकरी क्रांतिकारी पक्ष, बविआ आणि शेकापच्या १० आमदारांनी सरकारला पाठिंबा दिला होता. विधानसभेत १३ अपक्ष, तर छोट्या पक्षांचे १५ आमदार आहेत. या २८ आमदारांवर काँग्रेसची मदार आहे.

बातम्या आणखी आहेत...