आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादविवाद:आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील - संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी (ता.१२) भाजपवर हल्ला चढवला. ‘४८ तासांसाठी सक्तवसुली संचालनालय (ईडी) आमच्या हातात दिले तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मत देतील,’ असा टोला खासदार राऊत यांनी लगावला आहे. तसेच पंकजा मुंडेंना एकटे पाडण्याचा भाजपचा डाव आहे. मुंडे कुटुंबीयांचे आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते असून आम्हाला पंकजा मुंडेंची काळजी वाटत असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

राऊत म्हणाले की, राष्ट्रपती निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी कॉन्स्टिट्युशन क्लब दिल्ली येथे संयुक्त बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह २२ नेत्यांना पत्र लिहिले आहे. मात्र, उद्धव ठाकरे त्यावेळी अयोध्या दौऱ्यावर असल्यामुळे या बैठकीला शिवसनेचा एक प्रतिनिधी हजर राहील, असे राऊत म्हणाले.

‘दिल्लीतील सत्ताधारी पक्ष निवडणुका जिंकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर किती बेमालूमपणे करत आहे, हे राज्यसभेच्या निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा दिसले. राज्यसभा निवडणुकांची मांडवपरतणी सुरू असतानाच त्याच मांडवात विधान परिषदेचे ११ उमेदवार उभे राहिले. मतांचे गणित हाताशी नसताना भाजपने २ जास्त उमेदवार उभे करावे, याचा अर्थ त्यांना घोडेबाजारात हरभरे टाकायचे आहेत व महाराष्ट्राचे वातावरण बिघडवायचे आहे, असा आरोप राऊतांनी केला.

कार्यकर्त्यांना उमेदवारी, मात्र पंकजांना एकटे पाडणे सुरू
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले आहे. गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवाऱ्या द्यायच्या, सत्तेची पदे द्यायची, मात्र पंकजा यांना एकटे पाडायचे, असे भाजपचे धोरण दिसते, असा आरोप राऊत यांनी रविवारच्या सामनामधून केला.

खा. राऊत हे महाभारतातील संजय आहेत का? : आमदार श्यामसुंदर शिंदे
नांदेड |
हस्तिनापूरला बसून कुरुक्षेत्रावर काय सुरू आहे, ही सांगण्याची महाभारतातील संजयची विद्या राऊत यांना प्राप्त झाली असेल तर त्याचा आनंद वाटेल, असा टोला कंधार-लोहा मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला. राऊत यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यासह काही अपक्षांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप केला हाेता. त्यानंतर आमदार शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. राज्यसभेच्या निकालानंतर भाजपने घोडेबाजार करून ही निवडणूक जिंकली असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. आमदार देवेंद्र भुयार, आमदार संजयमामा शिंदे, यासोबतच आमदार श्यामसुंदर शिंदे यांनीदेखील शिवसेना उमेदवाराला मतदान केले नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. ‘ही निवडणूक परस्पर विश्वासाचा भाग आहे. शेकाप महाविकास आघाडीचा सहयोगी पक्ष आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून मतदान केले, असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.’

बातम्या आणखी आहेत...