आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा निवडणुकीत ‘हाॅर्स ट्रेडिंग’चा बोलबाला चालू असतानाच २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने रिंगणात एकूण ११ उमेदवार उतरणार असून विधान परिषदेचीही निवडणूक अटळ असल्याचे दिसत आहे. १० व्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांत मोठी टस्सल होणार आहे.
उमा खापरे वगळता भाजपच्या चार आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी व काँग्रेस सदस्यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या यादीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीच पुन्हा छाप दिसून आली. शिवसेना नेतृत्वाने तरुणांना प्राधान्य दिले असून काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीचा विचार करून उमेदवारी दिल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रवादीने मात्र ज्येष्ठांच्या सभागृहात ज्येष्ठांना पाठवणे पसंत केले आहे.
भाजप, शिवसेना, काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर
भाजप : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड, शिवसेना : सचिन अहिर, आमशा पाडवी, काँग्रेस : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे.
राष्ट्रवादी : (संभाव्य ) एकनाथ खडसे, रामराजे नाईक-निंबाळकर
विजयासाठी हवी २७ मते
- विधानसभा सदस्यांमधून परिषदेवर १० सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये भाजप ४, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी २ असे एकूण १० आमदार निवडले जाऊ शकतात.
- भाजपचे १०६, आघाडीचे १५२, अपक्ष १३ आणि छोटे पक्ष १६ असे २८७ आमदार विधानसभेत आहेत. विधान परिषदेवर जाणाऱ्या प्रत्येक उमेदवारास विजयासाठी २७ मते आवश्यक आहेत.
- मतदान गुप्त पद्धतीने आहे. भाजपने ५ वा उमेदवार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यापैकी एक उमेदवार निवडून जाऊ शकतो.
- १३ जून रोजी अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. मात्र राज्यसभेचा एका जागेचा संघर्ष पाहता, भाजप ५ वी उमेदवारी मागे घेण्याची शक्यता नाही. त्यामुळे मतदान होण्याची शक्यता आहे.
- भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व विद्यमान उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. फडणवीस समर्थक सदाभाऊ खोत यांनाही यंदा उमेदवारी मिळाली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.