आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:भविष्यात राहुल नार्वेकरांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, पत सांभाळावी : राऊतांचा इशारा

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कायद्याच्या चौकटीत राहून लवकरात लवकर निर्णय द्यावा लागेल, अन्यथा भविष्यात त्यांना रस्त्यावर फिरणे अवघड होईल, असा इशारा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

राऊत म्हणाले, राहुल नार्वेकर हे लंडनमधून सध्या मुलाखती देत आहेत. ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचीही चौकशी करण्याची भाषा ते करत आहेत. नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहास मोठा आहे. पक्षांतर हा नार्वेकर यांचा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणे हा त्यांचा व्यवसाय आहे. आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. त्यांनी फक्त सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे. अन्यथा महाराष्ट्र काय आहे, हे दाखवावे लागेल.

राऊत म्हणाले, नार्वेकर हे वकील असतील तर त्यांनी न्यायालयाचा निकाल पुन्हा वाचावा. त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय द्यावा. तो ही लवकर द्यावा लागेल. पक्षांतराला उत्तेजन देऊन लोकशाहीची हत्या होत असेल तर महाराष्ट्र हे सहन करणार नाही.

कोश्यारींनी निवडणूक होऊ दिली नाही : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन बदमाश राज्यपालांनी आम्हाला अध्यक्षपदाची निवडणूक घेऊ दिली नाही. दिल्लीच्या आदेशावर राज्यपालांनी असे केले. कारण त्यांना पुढे सरकार पाडायचे होते. त्यामुळेच ज्याला लोकशाहीबद्दल चाड नाही, पक्षांतराबद्दल राग नाही, अशा व्यक्तीला राज्यपालपदावर बसवले. कोश्यारींना महाराष्ट्र आज काय म्हणून ओळखतो, हे नार्वेकरांना माहित आहे. इतिहासात तुमचीही नोंद तशी होऊ नये, याची खबरदारी नार्वेकरांनी घ्यावी.