आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेंबूर-वाशीनाका येथे डोंगर उतारावर राहणाऱ्या झोपड्यांवर दरड कोसळल्याने रविवारी १९ रहिवाशांचा बळी गेला. या दुर्घटनेने मुंबई परिसरात डोंगर उतारावर राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न ऐरणीवर आला असून मुंबईत २२ हजार ४८३ कुटुंबे धोकादायक दरडीखाली राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
पूर्वी मुंबई म्हणजे बाॅम्बस्फोटाचे शहर म्हटले जात होते. अलीकडे इमारती व दरड ढासळणे अन् डेंग्यू, टीबी व लेप्टो या रोगांचे आगार अशी मुंबापुरीची ओळख बनली आहे.
मुंबईतील ३६ पैकी २५ विधानसभा मतदारसंघांत २५७ ठिकाणे दरडीप्रवण असल्याने राहण्यासाठी धोकादायक म्हणून वर्गीकृत आहेत. या भागातील २२ हजार ४८३ झोपड्यांपैकी ९ हजार ६७७ झोपड्यांना तातडीने स्थानांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने राज्य शासनाला केली आहे. उर्वरित डोंगर उतारावरच्या झोपड्यांना टेकड्यांच्या आजूबाजूला तटबंदी बनवून संरक्षित करण्याचे प्रस्तावित केले आहे.
१९९२ ते २०२१ या दरम्यान मुंबई पालिका हद्दीत दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत २९० रहिवाशांनी जीव गमावला आहे. या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
२०१० मध्ये मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने दरडीखाली राहणाऱ्या रहिवाशांचे स्थलांतर करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. मंडळाच्या अहवालामुळे सप्टेंबर २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दहा वर्षे उलटून गेली, परंतु नगरविकास विभागाने त्याची अद्याप अंमलबजावणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याप्रमाणे यापैकी कोणताही अॅक्शन टेकिंग प्लॅन (एटीपी) प्रशासनाने तयार केलाच नाही. बृहन्मुंबई महापालिकेवर गेली ३० वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. पालिका प्रशासन अशा दुर्घटना घडल्या की, सदर वस्ती जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर असल्याचे सांगून मोकळी होते. चेंबूरच्या कालच्या दुर्घटनेवर पालिकेने जिल्हाधिकारी यांच्याकडे बोट दाखवून हात झटकले.
कामाचा दर्जा निकृष्ट, कंत्राटदारांची होते चांदी
दरडीजवळ संरक्षक भिंत घालण्यासाठी कंत्राटदारांमध्ये चढाओढ असते. शक्यतो ही कामे आमदार निधीतून होतात. या कामांचा दर्जा निकृष्ट असतो. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास संरक्षक भिंतीसकट दरड झोपड्यांवर काेसळून दुर्घटनांमध्ये नागरिकांचा बळी जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.