आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक!:एका घटनेत दिरंगाईने रुग्णाचा जीव गेला, दुसऱ्यात जिवाशीच खेळ; महाराष्ट्रातील भीषण वास्तव

मुंबई, नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सिलिंडर नेेण्यासाठी वितरकाकडे लागलेली रांग. - Divya Marathi
सिलिंडर नेेण्यासाठी वितरकाकडे लागलेली रांग.
  • ठाणे : कोरोनाग्रस्ताचा तडफडून मृत्यू; मालेगाव : रुग्णाला घरीच ऑक्सिजन लावून उपचार

ठाणे : रुग्णवाहिकेत फक्त वाहक, काय करायचे या गोंधळातच दोन तास गेले...

मुंबई | रुग्णवाहिकेच्या चालकाकडे पीपीई किट नसल्याने एका वयोवृद्ध कोराेना रुग्णाचा रस्त्यावर तडफडून बुधवारी मृत्यू झाला. शंभर-दीडशे लोकांच्या डोळ्यादेखत माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बुधवारी दुपारी घडली. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

वागळे इस्टेट भागातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या ६० वर्षांच्या वयोवृद्ध रुग्णास मागच्या आठवड्यात ताप आला होता. त्याच्या मुलीने दोन दिवसांपूर्वी कळवा येथील पालिकेच्या विशेष कोविड रुग्णालयात नेले. मात्र, केवळ ताप आलेल्या रुग्णास दाखल करून घेत नाही, असे उत्तर त्यांना देऊन परत पाठवण्यात आले. त्यानंतर खासगी लॅबमध्ये त्यांच्या मुलीने आपल्या पित्याची कोरोना चाचणी केली. बुध‌वारी या रुग्णास पुन्हा त्रास होऊ लागला. तसेच चाचणीचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णाच्या मुलीने एका माजी नगरसेवकाच्या मदतीने कशीबशी रुग्णवाहिका मिळवली. रुग्णवाहिका आली त्या वेळी रुग्ण अत्यवस्थ होता.

.... त्यामुळे ते घरी परतले

चाचणी अहवाल आला नव्हता. त्यापूर्वी रुग्णास ताप आला म्हणून रुग्णाच्या मुलीने ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यास नेले. मात्र, काेरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह असल्यास दाखल करून घेतले जाते, असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यामुळे ते परत घरी आले.

अॅम्ब्युलन्समध्ये डॉक्टर नव्हता, पीपीई किटही नाही

रुग्णवाहिकेत केवळ चालक होता. त्याच्याकडे पीपीई किट नव्हते. सोबत डॉक्टर वा मदतनीस नव्हते. त्यामुळे रुग्णास रुग्णवाहिकेत कसे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण झाला. हा गोंधळ चालू असताना रुग्ण मात्र रस्त्यावर तडफडत होता. ते पाहून बरेच लोक तेथे जमा झाले. मात्र, कोरोना रुग्ण असल्याने त्यांच्या मदतीला कोणीच आले नाही. शेवटी दोन तासांनंतर या रुग्णाने रस्त्यावरच आपले प्राण सोडले. या प्रकारामुळे ठाणे पालिकेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

कोरोना हॉटस्पॉट मालेगावात रुग्णांना रुग्णालयात दाखल न करता घरीच ऑक्सिजन सिलिंडर लावून उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील कोविड सेंटर्समधून ८० सिलिंडर्स गायब झाले असून सुमारे १५० ते २०० सिलिंडर्स अत्यवस्थ रुग्णांना घरीच लावल्याचे कळते. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेने असे ऑक्सिजन सिलिंडर्स नाकारू नयेत अशी नोटीसच वितरकांना काढली आहे.

मालेगावात प्रशासनाने नेमलेले ‘जीवन’ हे कोविड हॉस्पिटल बंद पडल्यावर संशयित व अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात नेण्याऐवजी घरातच ऑक्सिजन सिलिंडर लावून उपचार सुरू आहेत. हॉस्पिटलशिवाय परस्पर घरी ऑक्सिजन सिलिंडर देण्यास कायद्याने मनाई आहे. रुग्णांवर देखरेखीबाबत डॉक्टरांची लेखी शिफारस असेल तरच घरी सिलिंडर देण्याची मुभा असते. मात्र, घरी लपलेले रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचणे, विलग करून कोविड सेंटर्समध्ये उपचार होणे, कुटुंबीयांना क्वाॅरंटाइन करणे, त्यांच्या तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. मात्र वेगळाच प्रकार सुरू आहे.

कोविड सेंटरमधून ८० सिलिंडर्स गायब

इंदूर गॅस एजन्सी ही ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा करणारी मालेगावातील एकमेव एजन्सी आहे. त्यांनी ९ एप्रिलपासून शहरातील रुग्णालये व कोविड सेंटर्सना १ हजार सिलिंडर्स वितरित केले आहेत. त्यापैकी ८५६ सिलिंडर्स त्यांच्याकडे परत आले आहेत. १०० सिलिंडर्स रुग्णालयात व सेंटर्समध्ये आहेत. मात्र ८० सिलिंडर्स परत आलेले नाहीत. जीवन हॉस्पिटलमधून गायब झालेले हे सिलिंडर्स वस्तीत घरगुती उपचारांसाठी फिरवले जात असल्याचा धोका व्यक्त होत आहे.

आमच्यावर दबाव आणला जातोय

राजकीय दबावामुळे पालिकेने पत्र दिल्याने घरी सिलिंडर देण्यात आले. ४५ रुग्णांच्या घरी सिलिंडर्स गेले आहेत. एका मृत रुग्णाचे सिलिंडर परस्पर दुसऱ्या रुग्णास लावण्याचे प्रकारही सुरू आहेत. पालिकेला कळवले, मात्र माझ्यावरच दबाव वाढतो. दररोज २०-२५ लोक रिक्षा घेऊन सिलिंडर्स नेण्यासाठी येत आहेत. - भरत मेहता, ऑक्सिजन सिलिंडर वितरक

बातम्या आणखी आहेत...