आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळ बैठक:औरंगाबादेतील वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कमधील उद्योगांसाठी प्रोत्साहन योजना

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांवर नुसतीच चर्चा

औरंगाबाद येथील प्रस्तावित वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क आणि रायगड जिल्ह्यातील बल्क ड्रग पार्कमधील उद्योगांना ५ वर्षांसाठी विशेष प्रोत्साहन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे राज्यामध्ये वैद्यकीय उपकरण तसेच औषधी उत्पादनास मोठा वाव मिळणार आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव बिलांमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाने पाठवला आहे. गुुरुवारी तो मंत्रिमंडळ बैठकीत आला नाही. मात्र त्यावर चर्चा झाली. लवकरच सवलतीचा निर्णय मार्गी लागेल, असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बैठकीनंतर सांगितले.

ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आहे, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर निर्णय होईल, असे मागच्या आठवड्यात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र बैठकीत तो काही चर्चेला आला नाही. वीज ग्राहकांना वाढीव बिलासंदर्भात कोणताही परतावा द्यायचा नसून आगामी बिलामध्ये त्याची वजावट करायची आहे. तरीसुद्धा हा प्रस्ताव रखडल्याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

विद्युत दरामध्ये प्रतियुनिट १.५ रुपये सूट : औरंगाबादेतील ऑरिक सिटीमध्ये ४२४ कोटींचा वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्क उभारण्यात येणार असून त्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांसाठी सामूहिक मूलभूत सुविधा उभारण्याकरिता वैद्यकीय उपकरण निर्मिती पार्कसाठी १०० कोटी रुपयांचे अनुदान केंद्र शासन देणार आहे.

या आहेत प्रस्तावित सवलती
- औद्योगिक विकास अनुदान- राज्यात होणाऱ्या प्रथम विक्रीच्या १०० टक्के राज्य, वस्तू व सेवा कर
- विद्युत शुल्क माफी- अनुदान उपभोगण्याच्या कालावधीपर्यंत
- मुद्रांक शुल्क माफी- गुंतवणूक कालावधीतील भूखंड खरेदी, भाडेपट्टा, बँक लोनकरिता गहाण खत इत्यादी सर्व प्रयोजनार्थ
- विद्युत दर सवलत
– रु. १.५ प्रति युनिट १० वर्षाकरिता
- अनुदान उपभोगण्याचा कालावधी- १० वर्षे
- लघु, लहान व मध्यम घटकांना सामूहिक प्रोत्साहन योजना २०१९ प्रमाणे व्याजदरात ५ % सवलत मिळेल.

प्रशासकांच्या कालावधीत ६ महिने वाढ
कोविडच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळामध्ये निवडणुका न झालेल्या औरंगाबाद महापालिकेसह १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकांच्या नियुक्तीचा कालावधी ६ महिन्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मे व जून २०२० मध्ये मुदत संपलेल्या ३ महानगरपालिका, ८ नगर परिषदा व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया कोविडमुळे स्थगित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सवलती : सामाईक सुविधा उदा. सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाफ, घनव्यवस्थापन इ. सुविधांकरिता वीज दरामध्ये १० वर्षांसाठी रु. २ प्रतियुनिट सवलत अथवा ओपन ॲक्सेसद्वारे वीजपुरवठा घेतल्यासही सवलत.

वाढीव वीज बिलप्रकरणी पवारांना भेटा; राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज बिलात सवलत द्यावी या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या वेळी कोश्यारी यांनी त्यांना शरद पवारांना भेटा असा खवचट सल्ला दिला. राज्यातील मंदिरे उघडण्याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. शिवाय मुख्यमंत्री मातोश्री अथवा वर्षा बंगल्यावरून राज्याचा गाडा हाकत असताना कोरोनाकाळात व अतिवृष्टीनंतर शरद पवार यांनी राज्यभरात दौरे केले होते. या पार्श्वभूमीवर कोश्यारी यांनी राज ठाकरेंना हा सल्ला दिला. दरम्यान, वीज बिलप्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहोत आणि गरज भासल्यास राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा करू, असे राज यांनी सांगितले.

आपकी हिंदी अच्छी कैसे है ? : राजभवनावरील भेटीप्रसंगी राज्यपाल कोश्यारी यांनी राज ठाकरेंना ‘आपकी हिंदी इतनी अच्छी कैसे है ?’ असे प्रश्न विचारले त्या वेळी “मैं हिंदी फिल्में बहुत देखता हूँ, इसलिए’ असे मिश्किल उत्तर राज ठाकरे यांनी दिले.