आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:मुंबईत मृतदेहांची संख्या वाढल्याने सर्वच शवगृहे झाली हाऊसफुल्ल, नातेवाईक क्वाॅरंटाइनमध्ये, अंत्यसंस्काराला कोणी नाही

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • शवगृहात नॉन कोविड मृतदेह मोठ्या संख्येने

अशोक अडसूळ 

कोविड-१९ संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह स्वीकारण्यास नातलग प्रतिसाद देत नाहीत. परिणामी बृहन्मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेहांची संख्या वाढत चालली असून शवगृहे हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामुळे बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी पालिका आता नवी नियमावली बनवणार आहे.

मुंबई पालिका क्षेत्रात आजपर्यंत कोरोना संसर्गाने ६२१ रुग्णांचे बळी गेले आहेत. शहरात दैनंदिन २० ते २२ कोरोना बळी जात आहेत. कोरोना बळीचा मृतदेह ३० मिनिटांत वाॅर्डाबाहेर, तर २ तासांत नातेवाइकांच्या ताब्यात द्यावा आणि कमाल ५ व्यक्तींच्या उपस्थितीत रुग्णालयाच्या जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत, असा साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या नियमान्वये दंडक घातला आहे. ‘अनेकदा मृताचे जवळचे नातेवाईक क्वाॅरंटाइनमध्ये असतात. 

काही नातलगांना शववाहिका उपलब्ध होत नाहीत. परिणामी मृतदेह शवगृहात ठेवावे लागतात, असे पालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष अमित घोले यांनी सांगितले. सायन आणि केईएम रुग्णालयात मृतदेहाच्या शेजारी रुग्णांवर उपचार होत असल्याची ध्वनिचित्रफीत गेल्या आठवड्यात पसरली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व रुग्णालयांच्या अधिष्ठातांची बैठक घेतली. शवगृहातल्या अर्ध्यापेक्षा अधिक जागा बेवारस आणि मेडिकल लीगल संबंधित मृतदेहांनी अडवल्याचे अधिकाऱ्यांनी महापौरांना सांगितले. यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे जाऊन बेवारस मृतदेहांचा प्रश्न निकालात काढण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले. 

शंभर क्षमतेची इमारत धूळ खात पडून

२००४ मध्ये सायन रुग्णालयात १०० क्षमतेचे शवगृह बांधण्यास घेतले. बांधकाम पूर्ण होण्यास ८ वर्षे लागली. शवगृहाच्या या इमारतीस ओसी नसल्याने ती इमारत अद्याप वापरात नाही, असे असले तरी कोरोना बळींसाठी स्वतंत्र शवगृह बांधण्याची सूचना गटनेत्यांनी केली आहे. शहरात पालिकेच्या सर्वधर्मीय ८१ स्मशानभूमी आहेत. चंदनवाडी, दादर व वरळी या स्मशानभूमीत सध्या दैनंदिन १० ते १२ मृतदेह येत आहेत. त्यामुळे मुंबईतील स्मशानभूमीवरचा ताण वाढला आहे. अशा प्रकारे मुंबईत मृतदेहांनी मृतदेहांची अडवलेली वाट मोकळी करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.  

शवगृहात नॉन कोविड मृतदेह मोठ्या संख्येने

शवगृह फुल्ल आहेत. शवगृहात नाॅन कोविड मृतदेह मोठ्या संख्येने आहेत. नातेवाइकांना संपर्क साधल्यास प्रतिसाद मिळत नाही. नाॅनक्लेम मृतदेहांवर यापुढे पालिका अंत्यसंस्कार करणार आहे. त्यासाठी नियमावली बनवण्यात येत असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...