आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक निकाल:अपक्षांनी केले भाजपचे ‘लाड’; देवेंद्रनीतीचा पुन्हा विजय, भाजपला 28  मते जास्त

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत राज्यात विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने बाजी मारली. भाजपचे सर्व ५ उमेदवार निवडून आले असून सत्ताधारी महाविकास आघाडीचे चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस) यांचा पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ झालेल्या या निवडणुकीत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचा करिष्मा कायम राहिला.

रात्री ९.३० वाजता पहिल्या पसंतीचा मतांचा कल हाती आला. त्यामध्ये भाजपला पहिल्या पसंतीची १३४, तर आघाडीला १५१ मते मिळाली. तत्पूर्वी, सकाळी ९ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सायंकाळी चारपर्यंत सर्व २८५ आमदारांनी मतदान केले. ५ वाजता मतमोजणीस प्रारंभ होण्यापूर्वी आघाडीच्या बाजूने भाजपच्या दोन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतला. दोन मतांवर राष्ट्रवादी व भाजपने आक्षेप नोंदवले. परिणामी पुन्हा दीड तास मतमोजणीचा खोळंबा झाला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही मते बाद ठरवली. रात्री ९ वाजता वैध २८३ मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाली. पहिल्या पसंतीच्या मतांवर भाजपचे ५, राष्ट्रवादीचे २, शिवसेनेचे २ उमेदवार विजयी ठरले. काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात दुसऱ्या फेरीमध्ये चुरस निर्माण झाली. रात्री साडेदहा वाजता दुसऱ्या फेरीत भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी ठरले.

क्राॅस व्होटिंगचा फटका; यांचा झाला विजय
निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे क्रॉस व्होटिंग झाले. पण यात काँग्रेसमध्येच फाटाफूट झाली

प्रवीण दरेकर, भाजप मते : 29, विजयी

राम शिंदे, भाजप मते : 30, विजयी

श्रीकांत भारतीय, भाजप मते : 30, विजयी

उमा खापरे, भाजप मते : 27, विजयी

प्रसाद लाड, भाजप मते : 28, विजयी

अटीतटीच्या लढतीत प्रसाद लाड यांनी २८ मते घेऊन विजय मिळवला.

एकनाथ खडसे, राष्ट्रवादी मते : 29, विजयी रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादीमते : 28, विजयी आमशा पाडवी, शिवसेना मते : 26, विजयी सचिन अहिर, शिवसेना मते : 26, विजयी भाई जगताप, काँग्रेस मते : 26, विजयी चंद्रकांत हंडोरे, काँग्रेस मते : 22, पराभूत

भाजपची बेरीज 0 + देवेंद्र = 28
पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे एकाही मताची तजवीज नव्हती. सगळी मदार देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होती. त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त सरस कामगिरी बजावली. अपक्षांची मते खेचली. प्रसाद लाड यांच्या विजयासाठी आवश्यक असलेले २८च्या कोट्याचे गणित अचूकपणे जमवले.

काँग्रेसची वजाबाकी 44 - 22 = 19
काँग्रेसकडे हक्काची ४४ मते होती. चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीची २५ मते मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्यांना २२ मते पडली. काँग्रेसची तीन मते फुटली. पहिल्या पसंतीत १९ मते मिळालेले जगताप दुसऱ्या पसंतीत विजयी झाले.

शिवसेनेचे गणित
55 - 52 = 03

राष्ट्रवादीचा गुणाकार
51 - 57 = +06

राष्ट्रवादीची अधिकृत मते ५१. प्रत्यक्षात मिळाली ५७ आणि खडसे म्हणतात, भाजपचीही मते मिळाली. मग ६ मते कुठून आली माहीत नाही.

निकालाचा परिणाम
1 विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे करिष्मा असलेले नेते असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. फडणवीस यांचा पक्षात आणि राज्याच्या राजकारणात दबदबा आणखी वाढणार आहे.
2 या निकालाने विरोधी पक्ष आणखी आक्रमक होईल. त्याउलट सलग दोन पराभव नोंदल्याने महाविकास आघाडी सरकार बचावाच्या पवित्र्यात जाईल.
3 महाविकास आघाडी सरकारच्या पाठीराख्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सिद्ध झाले असून आघाडीत समन्वय नसल्याचे अधोरेखित झाले.
4 जुलैमध्ये होणाऱ्या
पावसाळी अधिवेशनात सरकारला विरोधकांच्या आरोपांना तोंड देणे मुश्कील होणार आहे. सरकारवर अविश्वास ठराव दाखल होऊ शकतो.
5 महाविकास आघाडीत यापुढे बेबनाव वाढत जाईल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी उघडतील.

भाजप : पहिल्या पसंतीची १३४ मते मिळवली, पाचही उमेदवार विजयी
काँग्रेस : तीन मते फुटली; पहिल्या पसंतीचा उमेदवार हरला, भाई विजयी
शिवसेना : दोन्ही उमेदवार विजयी, तीन मते कुणाला ते अद्याप रहस्य
राष्ट्रवादी : सहा मते जास्त म्हणून काँग्रेसच्या एकाचाही कोटा पूर्ण नाही

बातम्या आणखी आहेत...