आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच सर्वांमध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा” या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत एक विश्व मराठी संमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्ट््स क्लब ऑफ इंडिया येथे ४ ते ५ जानेवारी २०२३ या कालावधीत हे विश्व मराठी संमेलन होणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
केसरकर म्हणाले की, हे संमेलन म्हणजे मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा यांचा वैश्विक पातळीवर होणारा भव्य दिव्य उत्सव असणार आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि एकूणच मराठीवर प्रेम करणाऱ्या, महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या सर्व मराठी भाषिकांनी या संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही मंत्री केसरकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील अन्य विभागाचे मंत्री तसेच केंद्रीय मंत्री हे संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दि. ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहित मंत्री केसरकर यांनी दिली.
वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृतीचे सादरीकरण लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्श घेणे हासुध्दा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरिक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरिक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.