आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीच्या राज्यात संयुक्त सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरची पहिली सभा नुकतीच पार पडली. दुसरी सभा नागपूरला होत आहे. या सभांमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली पाहिजे. आपल्या पक्षाच्या कुणी नेत्यांनी दरम्यानच्या काळात उलटसुलट भूमिका मांडू नये, अशी सक्त ताकीद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत दिल्याचे कळते.
राज्यातील तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने (एनसीपी) पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. मंगळवारी (४ एप्रिल) बेलार्ड पिअर येथील प्रदेश कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बड्या नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये जिल्हा-तालुका पातळीवरील पक्षांतर्गत निवडणुका घेणे, बूथस्तरापर्यंत पक्षबांधणी करणे आणि राज्य विभागीय शिबिरे घेणे यासंदर्भात आराखडा निश्चित करण्यात आला.
या बैठकीला अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, राजेश टोपे, सुनील तटकरे, रामराजे निंबाळकर, जितेंद्र आव्हाड आदी ३० नेते हजर होते. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पुढच्या दीड महिन्यात तालुका, जिल्हा स्तरावरच्या पक्षांतर्गत निवडणुका पूर्ण केल्या जाणार आहेत. एप्रिल व मे महिन्यात राज्यात विभागवार शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांना पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: उपस्थित राहणार आहेत. पावसाळ्यापूर्वी ही शिबिरे पार पडतील. बूथस्तरापर्यंत पक्षाचे नेटवर्क स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याची जबाबदारी मोठ्या नेत्यांवर सोपवली जाणार आहे. तसेच मोठ्या नेत्यांना सर्व जिल्ह्यांचा दोन महिन्यांत दौरा करण्याच्या सूचना आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीबाबत घेतला यू टर्न
संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पदवीचा प्रश्न उपस्थित केला होता. दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांनी ‘पदवीचा प्रश्न आता कशाला?’ अशी उलट भूमिका मांडली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज संवाद साधताना “पंतप्रधानांच्या पदवीची चिकित्सा होणारच,’ अशी भूमिका स्पष्ट करत राष्ट्रवादीने मोदी यांच्या पदवीसंदर्भात यू टर्न घेतल्याचे अधोरेखित केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.